Search This Blog

Showing posts with label fort. Show all posts
Showing posts with label fort. Show all posts

Monday, January 11, 2016

वसई चा किल्ला - Bassein Fort - Vasai Fort



मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा विशाल जलदुर्ग मदतीची हाक मारत उभा आहे. विशाल ह्या साठी की हा किल्ला ११० एकर वर्ग इतक्या क्षेत्रफळावर पसरलेला आहे. पूर्वी ह्या किल्ल्याच्या तीन बाजुंना पाणी / दलदल असायची पण आता समुद्र काही किमी आत सरकला आहे आणि किल्ला समुद्र तीरी वसल्यासारखा दिसतो. किल्ल्याभावती तिवराच जंगल दिसतं. आणि किल्ल्याला लागून उभी राहिलेली बांधकामं. किल्ल्यामध्ये बघण्यासारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत तसेच दुर्लक्षित राहिल्यामुळे किल्ल्यात दाट जंगलाचा भाग हि आहे. आता ही वेडीवाकडी वाढलेली झाडं, वेली इथल्या अमूल्य ऐतिहासिक वास्तूंना वेढा घालून बसल्या आहेत ज्यामुळे ह्या पुरातन बांधकामाची वेगाने क्षती होत आहे. किल्ल्यात ताडीची झाडं उगवली आणि तो धंदा ही जोरात चालू आहे म्हणूनच म्हटलं की हा अप्रतिम किल्ला मदतीची हाक मारत उभा आहे. 



हा किल्ला जरी पोर्तुगीजांची ओळख सांगणारा असला तरी हा खरा बांधला तो भंडारी भेंडाले ह्या सरदाराने १४१४ साली. त्यापूर्वी सुद्धा हा प्रदेश प्रसिद्ध होताच ते म्हणजे एक बंदर म्हणून, अगदी यादव राजांच्या काळात आणि त्या पूर्वी सुद्धा ह्या प्रदेशाचा उल्लेख आढळतो पण किल्ला बांधला गेला तो भंडारी भेंडाले ह्यांच्या कार्यकाळात. पुढे गुजराथ सुलतानाने किल्ला ताब्यात घेतला तो १५३० साली आणि नंतर पोर्तुगीजांनी किल्ला जिंकला तो १५३४ साली असं इतिहास सांगतो. आणि किल्ल्याचा खरा उत्कर्ष घडला तो पोर्तुगीजांच्या काळात, साधारण दहा वर्ष किल्ल्याचे बांधकाम सुरु होते. भक्कम तटबंदी, १० बुरुज आणि एका नंतर एक बांधली गेलेली सात चर्च तसेच न्यायालय, तुरुंग, आश्रम, जहाज बांधणी चे कारखाने, पुरातन स्नान गृहे, दवाखाने असं बरच काही ह्या किल्ल्यात बनत राहिलं नंतर १७३७ साली मराठ्यांने हा किल्ला जिंकून त्याचे नामांतर ही केले होते तेव्हा किल्ल्याचे नाव होते “बाजीपूर” आणि किल्ल्यात बरेच काम ही केली गेली. हा किल्ला जिंकतांना १२०० मराठे आणि ८०० पोर्तुगीज सैन्य धारातीर्थी पडलं आणि गडावार भगवा फडकला. तब्बल २०५ वर्षांनी वसई पोर्तुगीजमुक्त आणि जुलूममुक्त झाली पुढे १७८० साली हा किल्ला ब्रिटीशांच्या हाती गेला आणि हळूहळू किल्ल्याचे महत्व कमी होत गेलं. १८६० साली ब्रिटिशांनी हा किल्ला चक्क भाडेपट्टी वर एका सैन्य अधिकाऱ्याला दिला आणि तिथे त्याने उसाची शेती केली. पोर्तुगीज चर्च चा कारखान्या आणि गोडाऊन सारखा उपयोग केला त्या काळात किल्ल्याची हानी होत राहिली. स्वातंत्रानंतर हा किल्ला दुर्लक्षितच राहिला. पण ह्या किल्ल्या अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे.
ह्या किल्ल्यामार्फत मासे, जातिवंत घोडे, जहाज बांधणी असे अनेक व्यवसाय भरभराटीस आले होते. पोर्तुगीजांच्या भरभराटी बरोबरच भूमिपुत्रांवर होणारे अतोनात अत्याचार आणि जबरदस्तीने चालेली धर्मपरिवर्तन सुद्धा ह्या किल्ल्याला पहावी लागली. १५४८ साली पोर्तुगीज संत फ्रान्सिस्को झेविर ह्या किल्ल्यात उतरला होता आणि त्याकाळात प्रचंड लोकांचे धर्मपरिवर्तन केले गेल्याची नोंद इतिहासात आहे.

किल्ला संपूर्ण बघायला एक अख्खा दिवस सुद्धा कमी पडतो. किल्ला बघता बघता अनेक रानफुलं, फुलपाखर आणि पक्षी बघायला मिळतात म्हणजे ऐतिहासिक वास्तू आणि निसर्ग भ्रमंती दोन्ही चा आनंद घेता येतो. आम्ही किल्ला बघायला सुरुवात केली ती दर्या दरवाजा कडून, समुद्राकडे उघडणारा हा दरवाजा. भरभक्कम भिंती आजही शाबूत आहेत आणि गत वैभवाची साक्ष देत खंबीर उभ्या आहेत. किल्ल्याच्या दरवाजाला लागून एक लहानसे मंदिर ही आहे आणि बाजूला तिवराची जंगलं. जुना लाकडी दरवाजा मात्र मोडकळीला आला आहे. प्रवेश सरळ ना ठेवता एका दरवाजा नंतर लगेच दुसरा दरवाजा ९० अंशाच्या कोनात बांधला आहे. इथून आत आलो की किल्ल्यात नाही तर जंगलात आल्याचा भास होतो इतकी झाडी आहेत. मग लागतात वाखारीचे अवशेष आणि मग सेंट जोसेफ चर्च, 



जोसेफ चर्च हे १५४६ ला बांधलं गेलं, घंटेसाठी बांधलेला मनोरा, तटबंदीला लागून असलेले हे चर्च त्याच्या मागच्या दराने तटबंदी कडे जायला दगडी शिड्या हि आहेत. एक मोठी कमान अजून शाबूत आहे आणि त्यावर आतून पोर्तुगीज पद्धतीची नक्षी आहे आणि समोर उंच मनोरा. त्यावर जायचा जिना ही मोडकळीस आला तरी शाबूत आहे. काही बंद केलेल्या खिडक्या आहेत. हे चर्च नंतर बरेच बदलेले असावे असं वाटतं. चर्च समोर दाट जंगल आणि ताडीची झाडं ही आहेत. बाजूच्या तटबंदी वरून समुद्राचे रूप बघायला मिळतं.



इथून हा रस्ता पुढे बालेकिल्ल्याकडे जातो हा मोठा परिसर आणि पाणी, शस्त्र भांडार आणि अनेक दगडी खोल्या असलेला बालेकिल्ला आहे. ह्याचा दरवाजा पडका आहे आणि इथे हि एका दरवाजा नंतर वळून दुसरा दरवाजा लागतो. विस्तीर्ण परिसर, जाड दगडी भिंती आणि बालेकिल्ल्याला लागून आहे नोस्सा सेन्होरा चर्च हे साधारण १५३५ साली बांधलं म्हणजे बालेकील्ल्यासोबातच ह्याचं काम सुरु झालं असावं. बाहेरील तटबंदी ही १५३६ नंतर बनवली गेली. 




बालेकिल्ल्याचा एक बुरुज जरा ठीक रुपात उभा आहे आणि जवळच स्नानगृह, न्यायालय आहे तसाच नागेश्वर मंदिर आहे. पुढे कारागृह, हॉस्पिटल ह्याचे अवशेष 


पुढे भव्य पण पडीक डोमिनिक चर्च, जे संत गोन्कॅलो च्या नावाने १५८३ ला बांधण्यात आलं, एकंदरीतच पोर्तुगीजांनी चर्च आश्रम ह्याच्या माध्यमातून धर्मप्रचाराचा जोर वाढवत नेला होता. हे चर्च आणि त्याला लागुनच असलेला आश्रम फारच मोठा आहे अर्थात हे सगळं आता भग्नावस्थेत बघायला मिळतं




ह्या चर्चला लागून डांबरी रस्ता जातो तो ओलांडला की भव्य चिमाजी अप्पा ह्याचे स्मारक. अप्रतिम पुतळा आणि त्यावर विराजमान योद्धा. खरोखर अप्रतिम कलाकृती आहे, अर्थात अलीकडचीच पण अभिमानाने मन भरून यावं अशी

ह्या रस्त्याने वसईकडे चालत निघालो की बाजूला कवायतीचे मैदान आणि पलीकडे अजून खंबीर उभी तटबंदी दिसते आणि हा रस्ता जिथून किल्ल्या बाहेर निघतो त्याच्या डाव्या वाजूला दिसतो एक खुष्कीचा मार्ग. अक्षरश: ह्या दरवाजातून गेलं की गोल फिरत चिचोळ्या वाटेने किल्ल्यात प्रवेश आहे. इथे आता मध्ये एक मारूतीच मंदिर आहे पण ते पूर्वी नसणार. ह्या दरवाज्यातून शत्रू आला तर अगदी हातावर मोजता येतील इतके सैनिक शेकडोच्या सैन्याला अडवून धरू शकतात अशी ह्या मार्गाची ठेवण आहे. हा दरवाजा आतून मात्र नक्षीकामाने नटला आहे किंवा असं म्हणू की इथे थोडे नक्षीकाम शिल्लक आहे.




ह्या दरवाज्याचा वरच्या बाजूला गेलं तर आपण फत्ते बुरुजावर जातो तिथे झेंडावंदनाची सोय आहे, बहुदा ठराविक कार्यक्रमाच्या वेळी इथे सरकारी झेंडावंदन हल्ली होत असावं

फत्ते बुरुजावरून समोर दिसत ते फ्रान्सिकन चर्च , हे सुद्धा प्रशस्त चर्च आहे आणि त्यात पोर्तुगीज राज्यासाठी काम करणाऱ्या वीर योध्याच्या कौतुकासाठी एक खास व्यवस्था आहे. ह्या चर्चच्या दगडी जमिनीवर थडग्याचे दगड नावासहित लावलेले आहेत, त्यावर त्या वीरा च नाव आणि काही पोर्तुगाल चिन्ह त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून लावलेले दिसतात. ह्या चर्च ची कमान आणि एकंदरीत बांधणी बघता हे नक्कीच एक अतिभव्य चर्च असणार ह्याची खात्री पटते. चर्च शेजारी आश्रम हि आहे


पुढे अजून काही चर्च काही पडीक घराचे अवशेष, जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष असं अजूनही बरच बघण्यासारखं आहे. दहा बुरुजांचा हा भव्य किल्ला वाचवण आणि जतन करणं अत्यंत महत्वाचं वाटत. काही वर्षपूर्वी इथे अनेक महत्वपूर्ण गोष्टी उत्खालनात सापडल्या त्यात काही विरगळ हि आहेत . 

विरगळ म्हणजे वीर पुरुषाची शिळा ज्यावर युद्धाचे प्रसंग कोरलेले असतात. म्हणजे लढतांना प्राण अर्पिलेल्या ह्या वीराचे विरगळ हे स्मारकच म्हणा ना. आता हि विरगळ ची पद्धत यादव आणि शिलाहार कालीन म्हणजे हा प्रदेश हजारो वर्षाचा इतिहास सांगू शकेल. इथे कदाचित असे अनेक पुरावे माहिती मिळू शकेल. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे केवळ वसई किल्ला आणि फक्त पोर्तुगीज हे समीकरण कदाचित उद्या खोट ठरेल.


चिमाजी अप्पा आणि त्यांच्या सोबत लढणाऱ्या सर्व वीरांचे आणि स्वभूमी परत मिळवण्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या १२०० वीर मराठ्यांचे विचार मानत घोळवत हि भटकंती संपते. 

वसई स्टेशन पासून रिक्षा आणि लोकल बस ची उत्तम सुविधा आहे ज्याने तुम्ही किल्ल्याच्या मधोमध पोहचू शकता. स्वत:चे वहान असल्यास किल्ल्यात वाहनाने हि फिरता येतं. किल्ला जमिनीवर असल्याने कुठे उंच चढाई नाही. ह्या किल्ल्याला एकदा भेट देणं नक्कीच गरजेचं आहे.


खाली नकाश्यामध्ये वसई किल्ल्यातली प्रेक्षणीय स्थळे  मार्क केली आहेत. 










Thursday, July 2, 2015

घोडबंदरचा किल्ला - Ghodbandar Killa

घोडबंदरचा किल्ला :

ठाणे शहरापासून जवळच उल्हास नदीच्या काठावर घोडबंदर किल्ला शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. ऐतिहासिक वस्तू ह्या जतन करण्यापेक्षा त्या दुर्लक्ष करण्याकडे आपला सगळ्यांचा कल असतो हे घोडबंदर किल्ला बघितला की प्रकार्ष्याने जाणवते. पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज असा खांदेपालट बघता बघता हा किल्ला एकेकाळी इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय ही होता. पण आता किल्याची अवस्था फारच दैनीय आहे . मागे काही वर्षापूर्वी ह्या किल्याची डागडुजी करून हा किल्ला एक पर्यटक आकर्षण बनवायचे प्रयत्न केले गेले असं ही ऐकलं पण ते पूर्ण फेल गेलेलं दिसून येत


पोर्तुगीज ठाण्यात आल्या नंतर त्यांनी ह्या किल्ल्याची बांधणी सुरु केली ती साधारण १५५० साली, अरबी घोड्यचा व्यापार ह्या बंदरातून व्हायचा म्हणून हे घोडबंदर आणि ते सुरक्षित राहावे म्हणून हा घोडबंदर किल्ला 
नंतर ह्या किल्ल्यात काहीना काही भर पडत राहीली ती १७३० पर्यंत. ह्या किल्ल्याचे नाव Cacabe de Tanna असं  ठेवलं होता त्यांनी. 


ह्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांनी एक चर्च बांधलं होतं ती वस्तू आज ही उभी आहे. जिथे कालांतराने एक हॉटेल मग कार्यालय आणि आता ओसाड खोल्या आहेत. आतील भिंत आणि जमिनी पूर्णपणे नवीन वाटतात, म्हणजे त्या आहेतच फक्त मूळ बांधकाम आणि दरवाजा पोर्तुगीज बांधणी दर्शवतो. 

ह्या चर्च च्या बाहेर एक मस्त वडाचं झाड आहे आणि त्या झाडावर ८-१० माकड भरदुपारी अगदी शांत झोपली होती. आमचं लक्ष सहज वर गेलं तर ही सतत धिंगाणा घालणारी माकड शांत झोपलेली दिसली. मी खरतर झाडावर झोपलेली माकड पहिल्यांदाच बघत होतो.

हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांकडून ही बरेच प्रयत्न झाले होते. १६७२ साली शिवाजी महाराजाच्या सैन्याला ही अपयश पचवावं लागलं होतं. पोर्तुगीजांचे सशक्त आरमार आणि आधुनिक शस्त्रास्त्रे ह्या जोरावर दिव दमण, वसई ते गोवा पर्यंत मुलुख मारला होता आणि जनतेवर जबरदस्ती धर्मांतर लादले जाऊ लागले. ती तक्रार छत्रपतीकडे गेली आणि मग पोर्तुगीजांना धडा शिकवायची कामगिरी थोरल्या बाजीरावांनी उचलली आणि त्यांचे धाकले बंधू चिमाजी अप्पा ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना पोर्तुगीजांवर चालून गेली. घोडबंदर किल्ला हा १७३७ साली मराठ्यांच्या ताब्यात आला. हा किल्ला आणि साष्टी बेट हे दोन्ही १०-१५ दिवसाच्या युद्धानंतर मराठांच्या हाती लागलं आणि पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून इथली जनता मुक्त झाली. पुढे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला आणि तेथे इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय वसवले.


किल्यामध्ये हल्ली काही दगडी कमानीचे अवशेष बाकी आहेत त्याच्या पुढे मोकळी जागा आहे. कमानी जवळ एक बुरुज आहे जिथे जायला लहानश्या दरवाजातून दगडी पाहिऱ्या आहेत. ह्या बुरुजावरून खाडी आणि बाजूचा हिरवागार निसर्ग अप्रतिम दिसतो. किल्ल्याच्या एका बाजूला गोडाऊन सारख्या चौकोनी खोल्या आहेत. पण त्याच्यावरचं छप्पर मात्र उडून गेलेल आहे 


किल्ल्याच्या मध्ये पाण्याचं मोठे टाकं आहे आणि त्याला पाण्याचा जिवंत प्रवाह आजही ही आहे त्यामुळे पाणी नेहमी  असते असं समजलं. किल्ल्यात आणि परिसरात बिबट्याचा वावर आहे आणि तशी बिबट्या संबंधी पाटी सुद्धा चर्चकडे जाण्याच्या रस्त्यावर दिसते




किल्ल्या मध्ये जागोजागी करटूल्याचे वेल लागलेले आहेत. त्याच्या पिवळ्या फुलांनी किल्ला सजलेला दिसला 







एकंदरीत हा इतिहासाचा साक्षीदार हल्ली मदतीची हाक मारत जीर्ण होत चाललेल्या अवस्थेत उभा आहे








घोडबंदर किल्ला आणि पोर्तुगीज कालीन चर्च - गुगल नकाश्यावर