Search This Blog

Tuesday, July 21, 2015

हुमायूनचा मकबरा - Humayun Tomb - UNESCO Site





हुमायून हा बाबर नंतर चा दुसरा मोगल सम्राट होता ज्याचं मूळ हे अफगाणिस्थान मधलं, १५३१ साली वडिलांकडून मिळालेलं राज्य हुमायून टिकवू शकला नाही. त्याच्या सावत्र भावांनी त्याच्या राज्याचे लचके तोडले आणि पुढे शेर शहा सुरी ने होमायुनचा संपूर्ण पराभव केला आणि त्याला राज्य सोडून मदतीसाठी पळावं लागलं, पुढे १५ वर्षांनी इराणच्या राज्याच्या मदतीने त्याने भारतात गमावलेलं राज्य परत मिळवलं. १९५६ साली त्याच्या मृत्यू नंतर दिल्लीच्या पुराना किल्यात हुमायून राजाला दफन केलं गेलं पण हेमू राजाने दिल्लीवर स्वारी करून किल्ला हस्तगत केला त्यापूर्वी हुमायून राजाच्या पार्थिवाला कबरीतून बाहेर काढून पंजाबला कलानौर ला परत दफन केलं गेलं पुढे हुमायून राजाचा मुलगा अकबर ने राज्य सांभाळल्यावर हुमायून राजाची पहिली पत्नी बेग बेगम ने आपल्या पतीच्या स्मरणार्थ विशाल स्मारक बनवलं तोच हा हुमायून मकबरा. मिरक मिर्झा घियास ह्या स्थापत्य विशारदाच्या अधिपात्यात हा मकबरा बांधला गेला आहे. मग हुमायून राजाच्या पार्थिवाला पंजाब मधून पुन्हा काढून इथे दफन केलं गेलं 


हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन पासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर मथुरा रोड वर हा हुमायूनचा मकबरा आहे. लाल वाळूच्या खडकापासून बांधलेली इतकी मोठी अशी ही पहिलीच वस्तू. हुमायून ची ही कबर भारतीय उपखंडात बांधली गेलेली पहिली भव्य कबर म्हणावी लागेल. ह्या इमारतीत अनेक राजघराण्यातील लोकांच्या कबरी आहेत ज्यामाध्ये बेग बेगम (जीने हे स्मारक उभारलं), हमीद बेगम तसाच हुमायून चा पणतू दारा शिकोह ह्याचं सुद्धा दफन करण्यात आलं. दारा शिकोह हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ ज्याला शहाजहान ने आपला वारसदार जाहीर केलं होतं पण औरंगजेबाने राज्यप्राप्तीसाठी आपला भाऊ दारा शिकोह ला मारून टाकलं अशी नोंद इतिहासात आहे. मोगलांचा शेवटचा राजा बहाद्दूर शहा जाफर ह्यला इंग्रजांनी इथूनच धरून रंगूनला हद्दपार केलं होतं. ह्या इमारतीचं बांधकाम हुमायून च्या मृत्युनंतर ९ वर्षांनी (सन १५६५) सुरु झालं ते १९७२ पर्यत सुरु होतं. जी आज युनेस्को च्या जागतिक वारसा च्या यादीत सामाविष्ट केलेली आहे. भारतात युनेस्को च्या जागतिक वारस यादीतील साधारण ३२ ठिकाण आहेत त्यातलीच ही एक वस्तू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी २०१० मध्ये या माकाबऱ्याला भेट दिली होती.

हुमायून चा मकबरा ३० एकर पसरलेल्या चार बाग बगिच्या मध्ये एका प्रचंड अश्या चौथऱ्यावर उभारला आहे ह्या चौथऱ्याची उंची ७ मिटर एवढी आहे आणि वर जाण्याचा दगडी जिना एकदम चढा आहे. गुढगा दुखावणारा हा जिना चढून गेलं की समोर मकबरा दिसतो, सध्या पश्चिमेकडचा मार्ग खुला ठेवल्या ने मकाब-या मध्ये जायला फिरून जावं लागतं

पण त्यापूर्वी डावीकडे चौथऱ्यावरच अनेक संगमरवरी कबरी उघड्या म्हणजे आकाश्या खाली दिसतात. मकबरा हा दोन माजली असून तो पिवळ्या काळ्या संगमरवरापासून बनवलेला आहे. त्यावरील डोम पर्शियन पद्धतीचा असून मकबरा ४७ मिटर उंच आहे . अतिशय प्रशस्थ अशी ही वस्तू असून नक्षीकाम अप्रतिम आहे.


संगमरवरात कोरलेल्या जाळ्या तर थक्क करून टाकणाऱ्या आहेत. अष्टकोनी मधल्या खोलीत हुमायूनची संगमरवरी कबर आहे तर आजूबाजूच्या खोल्यांमध्ये राजघराण्यातील इतरांच्या कबर घडवलेल्या दिसतात. अर्थात खऱ्या कबरी ह्या तळ घरात असून तिथे जायला बंदी आहे. सुदैवाने काही साफसफाई च्या कामानिमित्त उघडलेल्या बेसमेंटला बघता आलं. मूळ कबरी ह्या साध्याश्या आहेत आणि वर स्थापलेल्या दर्शनाच्या कबरी मात्र उत्तम नक्षीकामासह आहेत. ह्या मकबरा परिसरात साधारण १०० कबरी आहेत पण सगळ्यांवर नाव न कोरल्याने बऱ्याच कबरी नक्की कोणाच्या हे समजत नाही 

निजामुद्दीन स्टेशन पासून अगदी जवळ आहे तिथून रीक्ष्या बसेस उपलव्ध आहेत. तिकीट : १० रुपये आणि फोटो कॅमेरासाठी वेगळं तिकीट नाही. आत गेल्यावर डाव्याबाजूला लहानसं उपहारगृह ही आहे. कमीत कमी साधारण २ तासाचा वेळ हुमायून मकबरा आणि आजूबाजूची स्मारकं बघायला लागतो. ह्यामध्ये बु हलीमा चा मकबरा, इसा खान चा मकबरा, अफसरावाला मकबरा, नीला घुमबाद वगैरे आहेत. दिल्लीदर्शन सहलीत हुमायून मकबरा हे एक महत्वाचं ठिकाण म्हणून पर्यटकांना दाखवण्यात येतं




हुमायूनचा मकबरा तसेच आजूबाजूची ठिकाणे गुगल नकाश्यावर 

Thursday, July 2, 2015

घोडबंदरचा किल्ला - Ghodbandar Killa

घोडबंदरचा किल्ला :

ठाणे शहरापासून जवळच उल्हास नदीच्या काठावर घोडबंदर किल्ला शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. ऐतिहासिक वस्तू ह्या जतन करण्यापेक्षा त्या दुर्लक्ष करण्याकडे आपला सगळ्यांचा कल असतो हे घोडबंदर किल्ला बघितला की प्रकार्ष्याने जाणवते. पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज असा खांदेपालट बघता बघता हा किल्ला एकेकाळी इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय ही होता. पण आता किल्याची अवस्था फारच दैनीय आहे . मागे काही वर्षापूर्वी ह्या किल्याची डागडुजी करून हा किल्ला एक पर्यटक आकर्षण बनवायचे प्रयत्न केले गेले असं ही ऐकलं पण ते पूर्ण फेल गेलेलं दिसून येत


पोर्तुगीज ठाण्यात आल्या नंतर त्यांनी ह्या किल्ल्याची बांधणी सुरु केली ती साधारण १५५० साली, अरबी घोड्यचा व्यापार ह्या बंदरातून व्हायचा म्हणून हे घोडबंदर आणि ते सुरक्षित राहावे म्हणून हा घोडबंदर किल्ला 
नंतर ह्या किल्ल्यात काहीना काही भर पडत राहीली ती १७३० पर्यंत. ह्या किल्ल्याचे नाव Cacabe de Tanna असं  ठेवलं होता त्यांनी. 


ह्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांनी एक चर्च बांधलं होतं ती वस्तू आज ही उभी आहे. जिथे कालांतराने एक हॉटेल मग कार्यालय आणि आता ओसाड खोल्या आहेत. आतील भिंत आणि जमिनी पूर्णपणे नवीन वाटतात, म्हणजे त्या आहेतच फक्त मूळ बांधकाम आणि दरवाजा पोर्तुगीज बांधणी दर्शवतो. 

ह्या चर्च च्या बाहेर एक मस्त वडाचं झाड आहे आणि त्या झाडावर ८-१० माकड भरदुपारी अगदी शांत झोपली होती. आमचं लक्ष सहज वर गेलं तर ही सतत धिंगाणा घालणारी माकड शांत झोपलेली दिसली. मी खरतर झाडावर झोपलेली माकड पहिल्यांदाच बघत होतो.

हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांकडून ही बरेच प्रयत्न झाले होते. १६७२ साली शिवाजी महाराजाच्या सैन्याला ही अपयश पचवावं लागलं होतं. पोर्तुगीजांचे सशक्त आरमार आणि आधुनिक शस्त्रास्त्रे ह्या जोरावर दिव दमण, वसई ते गोवा पर्यंत मुलुख मारला होता आणि जनतेवर जबरदस्ती धर्मांतर लादले जाऊ लागले. ती तक्रार छत्रपतीकडे गेली आणि मग पोर्तुगीजांना धडा शिकवायची कामगिरी थोरल्या बाजीरावांनी उचलली आणि त्यांचे धाकले बंधू चिमाजी अप्पा ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना पोर्तुगीजांवर चालून गेली. घोडबंदर किल्ला हा १७३७ साली मराठ्यांच्या ताब्यात आला. हा किल्ला आणि साष्टी बेट हे दोन्ही १०-१५ दिवसाच्या युद्धानंतर मराठांच्या हाती लागलं आणि पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून इथली जनता मुक्त झाली. पुढे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला आणि तेथे इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय वसवले.


किल्यामध्ये हल्ली काही दगडी कमानीचे अवशेष बाकी आहेत त्याच्या पुढे मोकळी जागा आहे. कमानी जवळ एक बुरुज आहे जिथे जायला लहानश्या दरवाजातून दगडी पाहिऱ्या आहेत. ह्या बुरुजावरून खाडी आणि बाजूचा हिरवागार निसर्ग अप्रतिम दिसतो. किल्ल्याच्या एका बाजूला गोडाऊन सारख्या चौकोनी खोल्या आहेत. पण त्याच्यावरचं छप्पर मात्र उडून गेलेल आहे 


किल्ल्याच्या मध्ये पाण्याचं मोठे टाकं आहे आणि त्याला पाण्याचा जिवंत प्रवाह आजही ही आहे त्यामुळे पाणी नेहमी  असते असं समजलं. किल्ल्यात आणि परिसरात बिबट्याचा वावर आहे आणि तशी बिबट्या संबंधी पाटी सुद्धा चर्चकडे जाण्याच्या रस्त्यावर दिसते




किल्ल्या मध्ये जागोजागी करटूल्याचे वेल लागलेले आहेत. त्याच्या पिवळ्या फुलांनी किल्ला सजलेला दिसला 







एकंदरीत हा इतिहासाचा साक्षीदार हल्ली मदतीची हाक मारत जीर्ण होत चाललेल्या अवस्थेत उभा आहे








घोडबंदर किल्ला आणि पोर्तुगीज कालीन चर्च - गुगल नकाश्यावर