टाकाऊ तून टिकाऊ हे वाक्य आपण खुपदा ऐकतो पण अश्या एखाद्या टाकाऊ जमिनीवर हिरवीगार वनराई निर्माण करून निसर्गाची जणू पूजा मांडल्याचा अनुभव येतो तो ह्या महाराष्ट निसर्ग उद्यानात. मुंबईच्या अगदी मध्यात असं दाट जंगल, विविध फुलपाखर आणि अनेक पक्ष्याची घरं असू शकतं हे तिथे प्रत्यक्ष गेल्यावरच कळतं. इथे साप ही आहेत पण जास्त करून Rat snake, जे माझ्या माहिती प्रमाणे विषारी नसतात आणि असं ही ते माणसाच्या नादी लागत नाहीत
मुंबईत सुट्टीच्या दिवशी मुलांना निसर्गाच्या सानिध्यात न्यायाची इच्छा असेल तर हि एक उत्तम जागा आहे. विविध पक्ष्यांचे वास्तव्व्य असल्याने पक्षीमित्रांची गर्दी तर हे उद्यान खेचतच पण त्याच बरोबर शांत सुंदर आणि निसर्गाने बहरलेलं वातावरण प्रेमी युगुलांना ही आकर्षित करत.
संपूर्ण कचऱ्याच्या ढिगाखाली खितपत पडलेली ही साधारण ३७ एकर जमीन काही विचारवंतांच्या सुपीक विचारांनी आणि मेहनतीने एका सुंदर उद्यानात रुपांतरीत झाली आहे. १९९४ पासून ह्या जमिनीभवती कुंपण करून वृक्ष संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली आणि आज इथे दाट जंगल पूर्णत्त्वास आलेलं बघायला मिळतं
मी आणि मजा छोकरा दोघे भर उन्हाळ्यात इथे पोचलो आणि २-३ तास कसे गेले ते समजलं सुद्धा नाही. खरं तर उद्यान सकाळी ८:३० ला उघडतं आणि शनिवारी रविवारी ७:३० ला आणि जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर इथे जायला हवं. आम्ही उद्यानात प्रवेश केला आणि लगेचच आम्हाला दोन तांबट पक्षांची ची मस्ती , कावळा कोकिळा पकडा पकडी, घारी ची शिकार, जंगली मैना आणि अनेक पानथळ जागेवर दिसणारे पक्षी दिसले. उद्यानाच्या बाजूला वाहणारी मोठी गटार नसून ती मिठी नदी आहे हे मुलाला सांगतांना मलाच लाज वाटत होती. इतकी दुर्गंधी ह्या नदीला येते. इतक्या कलुषित पाण्यात काय मासे वाढणार आणि काय हे पक्षी तिथे खाणार. नदी ची ती दशा बघून नक्कीच वाईट वाटत.
उद्यानात विविध संस्थेचे निसर्ग संबंधित तसेच फोटोग्राफी, चित्रकला शिबिरं हि होतात आणि त्यासाठी उत्तम व्यवस्था इथे आहे. स्वच्छ प्रसाधनगृहे आणि उत्तम पाण्याची व्यवस्था ही नेहमी न आढळणारी काही वैशिष्ठे इथे बघायला मिळतात. अर्थात बाजूला धरावी ची प्रसिद्ध वसाहत आणि मिठी नदीत प्रचंड कचरा त्यमुळे अनेक कावळे घिरट्या मारतांना प्रथम दिसतात पण जरा नजर फिरवली तर बाकी पक्षी सुद्धा नजरेस पडतात. विविध फुलांची झाडं आहेत आणि सर्व ऋतूमध्ये बहरणारी झाडं इथे मोठ्या विचारपूर्वक लावली आहेत. बहावा, रक्त चाफा, कैलाशपती वगैरे झाडांनी आणि दाट सावलीने बनवलेल्या नैसर्गिक ए सी ने आमचा संपूर्ण थकवा काढून टाकला. उद्यानाची देखरेख करायला टीम आहे जे सतत उद्यानात फेरफटके मारत असतात. उद्यानात सुंदर नर्सरी सुद्धा राखलेली आहे. सप्टेंबर ते मार्च हा इथे जायला बेस्ट मोसम असावा अर्थात भर उन्हाळ्यात ही फुलपाखर कमी दिसतील पण १२ महिने इथे जायला हरकत नाही
ह्या उद्यानाची प्रवेश फी रु १० आहे जी खरोखरीच खूप कमी आहे. सायन स्टेशन पासून अगदी चालत तुम्ही ह्या उद्यानात जाऊ शकता. एखाद्या शनिवारी किंवा रविवारी तुमच्या मुलांना घेऊन छोटेखानी पिकनिक नक्की करा
महाराष्ट्रा निसर्ग उद्यान - गुगल नकाशा इथे दाखवला आहे