Search This Blog

Sunday, September 27, 2015

बारा मोटाची विहीर - Bara Motachi Vihir







सातारा आणि परिसर हा पर्यटकांना नक्कीच आकर्षित करणारा परिसर आहे. कास पठार, अजिंक्यतारा, सज्जन गड, ठोसेगरचा धबधबा आणि असं बरच काही पण त्याच बरोबर काही प्रसिद्धी पासून दूर राहिलेली तरीही नक्की भेट द्यावी अशीही काही ठिकाणं साताऱ्या परिसरात आहेत. ह्या अश्या काहीश्या दुर्लक्षित ठिकाणांपैकी एक आहे “ बारा मोटाची विहीर ”. हि एक प्रचंड अष्टकोनी विहीर का बांधली गेली ? कोणी बांधली? आणि आज तिची स्थिती काय आहे ? असे अनेक प्रश्न मनात होते जेव्हा मला ह्या पुरातन विहिरी बद्दल माहिती मिळाली आणि योगायोगाने लवकरच ही अप्रतिम कलाकृती बघण्याचा योग आला.

मी आणि आमचे भटकंतीत रमणारे काही मित्र कास पठारावर निसर्गाने मांडलेले रान फुलांचे गालिचे आणि केलेली रंगांची उधळण बघायला गेलो होतो आणि मग परततांना ह्या बारा मोटाच्या विहीरीला ही अगदी ठरवून गेलो. काही माहिती होती तर एक पूर्वी जाऊन आलेला जाणकार मित्र ही बरोबर होता. साताऱ्याहून पुण्याकडे येतांना साधारण साताऱ्यापासून १७ किमी अंतरावर लिंब नावाचं एक लहानसं गाव आहे. विहिरी पर्यंत जाणारा रस्ता ही कच्चा आहे पण गाडीने अगदी विहिरी जवळ जाता येते. हल्ली गावात विहिरीचा रस्ता दाखवणारे दिशादर्शक फलक ही लावलेले आहेत 


शाहू महाराजांना वयाच्या ७ व्या वर्षापासून औरंगजेबाने नजरकैदेत ठवले होते आणि त्यांना राजा म्हणून मान्यताही दिली होती, त्यांना ७ हजारी मनसब बहाल झाली होती पण स्वराज्याचा राजा कैदेत होता. शाहू महाराज कैदेत असतांना शाहू महाराजांचा विवाह मानसिँहराव रुस्तूमराव जाधवराव यांचि कन्या अबिँकाबाई / राजसबाई यांच्याशी झाला होता त्या दुर्दैवाने काही काळाने तेथेच वारल्या, त्यांच्यासोबत वीरुबाई आंदण दिल्या होत्या. पुढे औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहू महाराजांची सुटका करण्यात आली जेणेकरून भोसले कुटुंबीयात राज सिंहासनासाठी आपसी वैमनस्य वाढून त्याचा फायदा मोगलांना मिळावा. पण शाहू महाराजांना अनेक जुन्या सरदारांची साथ मिळाली आणि ते १२ जानेवारी १७०८ रोजी सिंहासनाधीश्वर झाले. सातारा स्वराज्याची राजधानी झाली. साताऱ्यापासून साधारण १७ कि मी अंतरावरील लिंबू गावात शाहु महाराजांनी देशभरातून विविध आंब्याची कलम आणून एक सुंदरशी आमराई वसवली होती आणि मग ह्या आमराई ला लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी राणी वीरुबाईनी हि अप्रतिम विहीर स्वता:च्या देखरेखीत बनवून घेतली होती





त्याचा उल्लेख वरील शिलालेखात सापडतो (श्री सौभाग्यवती वीरुबाई साहेब ) ह्या विहिरीचे बांधकाम ५ वर्ष ३ महिने चालले. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार साधारण नोव्हेबर १७१९ ला चालू झालेले हे बांधकाम फेब्रुवारी १७२५ ला पूर्ण झालं (शके कार्तिक वद्य त्रयोदशी शक १६४१ ते फाल्गुन वद्य द्वितीया शक १६४६). ह्याची नोंद विहिरीच्या प्रमुख द्वाराजवळील शिलालेखावर दिसते. शिलालेखावरील अक्षरे जुळवत वाचून हे समजते. इथेला शिलालेखाचा फोटो अक्षरे जोडून टाकला आहे. ह्या शिलालेखामाध्ये बहुदा विष्णूचा वराह अवतार कोरला आहे पण तो तितकासा स्पष्ट दिसत नाहीप्रमुख जिन्याशी असलेल्या ह्या शिलालेखा खालून विहिरीकडे जाणारा प्रमुख जिना उतरतो तो आपल्याला उपविहिरीत घेऊन जातो आणि समोर दिसते पालखीसारखी एक लहान खोली जिथे जायचा रस्ता मात्र समाजत नाही. हि आहे राजेसाहेबांची विश्रांती आणि प्रसंगी गुप्त खलबतची खोली. इथे 


जायला अत्यंत चिंचोळा जिना विहिरीच्या डावीकडून आहे. ह्या खोलीतील खांब नक्षीने सजवलेले आहेत. तिथे पडदे बगैरे लावण्यासाठी लोखंडी हुक आज ही शाबूत आहेत. ह्या खोली खालून गेलो की दिसते प्रमुख विहीर जी भव्य आहे आणि अगदी दुष्काळी परिस्थितीतही १२ महिने पाणी असतं जे आजही लिंब गावाला हिरवागार ठेवतय. ह्या अष्टकोनी प्रमुख विहिरीला ९ मोटा आहेत. आणि उप विहिरीला ६ मोटा लावलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत १५ मोटा पण बहुदा ३ मोटा ह्या जादाच्या व काचित प्रसंगी वापरत घेत असाव्या म्हणून ह्याला बारा मोटाची विहीर म्हणून ओळखतात असं समजलं. विहिरी पर्यंत पोचण्याचे दगडी जिने अजूनही अगदी मजबूत दिसतात, एकंदरीत ही विहीर उत्तम परिस्थितीत आहे म्हणूनच प्रेक्षणीय ही आहे.





प्रमुख विहिरीच्या भिंतींवर सिंह शिल्प आहेत आणि काही शिल्पामध्ये सिंह चर हत्तींना पायदळी तुडवतो आहे जे चार पातशाह्या मारल्याचे चिन्ह आहे तर उत्तरेकडे झेपावणारे सिंह दिल्ली केडे झेपावत आहेत अस मानलं आहे. खरोखरीच बाजीरावांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं होत. 







एका दरवाजावर दोन्ही बाजूला शरभ शिल्प ही आहेत. शरभ हा काल्पनिक प्राणी अनेक संस्कृत उताऱ्यामध्ये नोंदवला आहे जो सिंह हत्तीपेक्षा ही सामर्थ्यवान मनाला जातो. तसेच महाल आणि इतर दरवाज्यांवर पुष्प चिन्हे ही कोरली आहेत.







उपविहीर आणि मूळ विहिरीच्या मधोमध जो छोटाखानी महाल आहे त्याच्या बरोबर वरती सिंहासनाची जागा आहे, अर्थात सिंहासन वगैरे नाही आता पण जेव्हा शाहू महाराज आमराईत येत तेव्हा ह्याच ठिकाणी बसून गावकऱ्याशी चर्चा , न्यायनिवाडा करत 

एकंदरीतच ही वास्तू फारच छान आणि मस्त वाटते. एकतर गुजराथमध्ये जश्या कलाकुसरीने युक्त आणि प्रचंड अश्या बाव (विहिरी) आहेत तश्या महाराष्ट्रात फारश्या नाहीत पण हि विहीर साधीशी पण सुस्थितीत आहे. 

ह्या विहिरीच्या समोर मात्र एक लहानसं मंदिर आहे, अगदी वडाच्या झाडाला खेटून पण नवलाची गोष्ट म्हणजे त्या मंदिराला कळस नाही. मंदिरा बाहेर लहानसा नंदी ही विराजमान आहे. कळस नसलेल्या मंदिराचं रहस्य काही उलघडलं नाही. गावात अजून ही काही पुरातन मंदिरं आहेत त्यातील एका कोटेश्वर मंदिराच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो त्याची माहिती ही ब्लॉगवर टाकतोच आहे.





सातारा ते बारा मोटाची विहीर हा रस्ता गुगल नकाश्यात दाखवला आहे .


No comments:

Post a Comment