शिळफाटा म्हंटल की खिडकाळेश्वाराचं पुरातन मंदिर किंवा अगदी शिळफाट्यावर वसलेलं दत्ताचं मंदिर ही चांगली माहितीतली मंदिर आहेत पण शिळफाट्या समोर दिसणाऱ्या टेकडीवर निसर्ग रम्य अश्या वातावरणात एक गणेशाचं सुंदर मंदिर ही आहे हे नेहमी त्या रस्त्याने जाणार्यांना फारतर माहिती आहे.
पावसाळ्यात हिरवागार होणारा हा परिसर हिवाळ्याच्या मध्यापर्यंत तसाच असतो. रानफुलं, हिरवीगार झाडं आणि ह्या सगळ्याच्या मध्ये वसलेलं टेकडीवरच हे एक लहानसं मंदिर नक्कीच भेट द्यावं असं आहे. पावसाचा जोर चांगला असेल तर जिथून टेकडी चढायला सुरुवात करतो त्याच्या थोडं डावीकडे पाण्याचा एक जोरदार ओहाळ बघायला आणि इच्छा असेल तर डुंबायला मिळतो.
शिळफाट्याला डोंबिवलीकडून आलो की डावा रस्ता पनवेल कडे, उजवा रस्ता मुब्र्याकडे आणि एक रस्ता समोर टेकडीवर जातो जो पुढे महापे मार्गे वाशीकडे जातो ह्या रस्त्यावर टेकडीचा अर्धा चढ गाडीने गेलो की डाव्याबाजूला काही वेळाने टेकडीवर जाणारे जिने दिसतात हेच तुम्हाला गणेश घोळ मंदिराकडे नेतात .
साधारण १४०-१५० स्टेपस आहेत पण दमावणाऱ्या नाहीत. साधारण १०-१५ मिनिटात तुम्ही ह्या मंदिरापर्यंत येऊन पोचतात. मंदिराचा परिसर स्वच्छ आहे आणि मंदिराची देखरेख , पूजा अर्चा करण्यासाठी एक महाराज मंदिरासमोर घर बांधून राहतात. परिसरात फुलझाड लावलेली असल्याने परिसर प्रसन्न वाटतो. एका खूप जुन्या वडाच्या झाडावर एक झोपडी बनवली आहे जिथे शिडीने जावं लागतं. नुकत्याच झालेल्या कुठल्याश्या एका सोहळ्यासाठी होम कुंड , हवन मंडप आणि काही लाकडाच्या झोपड्याही बनवल्या आहेत. बहुदा एखाद्या साधू चा आश्रम असावा
मंदिराकडे नेणारा रस्ता नागमोडा आहे आणि परिसर हिरवागार असल्याने खूप प्रसन्न वाटत. मंदिरात दगडाला शेंदूर फासून एक नैसर्गिक मूर्ती आणि एक गणरायाची नवीन मूर्ती अश्या दोन मुर्त्या आहेत. मंदिर एका मोठ्ठ्या दगडाच्या खोबणीमध्ये वसवलं आहे. ह्या टेकडीवरून आजूबाजूचा परिसर ही मस्त दिसतो. पावसाळ्यात मनमुराद भिजत जायला डोंबिवली जवळचा हा एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. हिवाळ्यात ही भरपूर पक्षी, रानफुलं आणि हिरवागार निसर्ग आपलं स्वागत करतच जणू इथे उभा असतो.
डोम्बिवली हून कार , दुचाकी किंवा अगदी वाशीकडे जाणाऱ्या बस ने आपण इथे पोहचू शकतो. फत्त कल्याणफाटा ला उतरून १०-१२ मिनिट जास्त चालावं लागतं. इथे यायला भरपूर बसेसची सोय आहे. भरभरून पाउस पडत असल्याने फोटो मोबाईल ने काढले कॅमेरा बाहेर काढायची हिंमत झाली नाही
गुगल नकाश्यामध्ये ह्या मंदिराचं नाव ओंकारेश्वर मंदिर दाखवलं आहे ते बदलायची विनंती गुगल कडे केली आहे
.
No comments:
Post a Comment