Search This Blog

Wednesday, June 24, 2015

आयेश्वर मंदिर - Ayeshwar Temple

सिन्नर ला गोंदेश्वर मंदिर हल्ली बऱ्याच लोकांना माहिती आहे पण नाशिक शिर्डी  मार्गावर सरस्वती नदीच्या किनारी आयेश्वराच एक प्राचीन मंदिर आहे ते फारसं कोणाला माहिती नाही आणि त्या मंदिराबद्दल फारशी माहिती सुद्धा उपलब्ध नाही. बरीच शोधाशोध केल्यावर आणि काही जुनी पुस्तक चाळल्यावर काही माहिती मिळाली ती इथे देतो आहे


नाशिक शिर्डी मार्गावर सिन्नर जवळ आडवा फाटा लागतो नाशिकहून येतांना तिथून डावीकडे वळलं की लगेचच आपण आयेश्वर मंदिराजवळ पोचतो. तिथे पहिल्यांदा एका लहानसा बगीचा लागतो आणि त्याला लागून जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रोडवर वळलो की लगेच आयेश्वर मंदिर दिसतं. ह्या मंदिराला एश्वरेश्वर मंदिर (Aishwaryeshvar Temple)  असं ही म्हणतात

हे महाराष्ट्रात बांधलेलं द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेलं एक सुंदर मंदिर आहे पण दुर्वैवाने मंदिराची पडझड दुरुस्ती पलीकडे गेलेली आहे. मंदिर सुदैवाने राष्ट्रीय सुरक्षित स्मारक च्या यादीत मोडतं त्यामुळे मंदिरा भवतीचा परिसर अतिक्रमाणा पासून सुरक्षित आणि मोकळा आहे आणि मंदिर परिसराला रीतसर कंपाउंड ही घातलेलं आहे पण मंदिराबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. असं म्हणतात की चालुक्य (कल्याणी) ज्याला द्राविडी शैली असं ही म्हणतात त्या शैलीतील सर्वात उत्तरेकडील मंदिर हे आयेश्वर मंदिर आहे. कालादृष्ट्या देखील जाणकारांच्या मते हे हेमाडपंती गोंदेश्वर मंदिरापेक्षा ही वरच्या क्रमावार आहे. हे मंदिर सुद्धा साधारण १०-११ व्या शतकातील आहे. पण मंदिर निर्मात्याची माहिती इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवून गेलेली आहे.

चाणक्य शैलीतील मंदिर महाराष्ट्रात ते ही यादव राज्यात कसे ह्याचा एक कयास असा मांडला जातो की त्याकाळी व्यापारी लोक विविध प्रदेशात व्यापार निमित्त फिरत, देश बघत आणि एखाद मंदिर किंवा त्याची कलाकुसर जरा मनात भरली तर हे श्रीमंत व्यापारी त्या कलाकारांना आपल्या भागात घेऊन येत आणि राजाच्या परवानगीने एखादा नवस किंवा आपल्या कडून धर्मिक कार्य घडावे म्हणून मंदिर निर्माण करत. कदाचित राजदरबारातील एखादा मंत्री सुद्धा अश्या प्रकारे मंदिर निर्मिती करत असे.


आयेश्वर मंदिराचे ठळक असे दोनच भाग आहेत गाभारा आणि मंडप.  मंदिराचा चौथरा विस्तीर्ण आहे आणि त्यावर आणखी एक मंडप बांधण्याचा विचार ही असावा असं दिसतं पण ते काम पूर्ण झालं नाही. तिथे उभारलेले स्तंभ फक्त दिसतात. 












गाभारा साध असून कोपऱ्यात अर्धे खांब आहेत. गाभाऱ्यात शंकराची पिंड आणि मंडपात नंदी विराजमान आहेत. नंदीच्या गळ्यात माळ आणि पाठीवर झूल आहे पण दगडाची झालेल्या झिजेमुळे कलाकुसर फारशी दिसून येत नाही. मंदिराचं शिखर मात्र आज जागेवर नाही , केवळ शिखराचा एक स्तर दिसतो. द्राविडी शैली प्रमाणे ते अनेक थरांचे शिखर असावे.

मंदिराच्या मंडपाचे खांब मात्र उत्कृष्ठ कलाकुसरीचा नमुना आहेत. कोरीव नक्षी कामा बरोबरच उत्तम मूर्तिकाम सुद्धा ह्या खांबांमध्ये दिसून येते. हे खांब सरळ आहेत, इतर मंदिराप्रमाणे वर चौकटी जवळ निमुळते झालेले नाहीत. ह्या खांबांवरची कलाकुसर बघून थक्क व्हायला होतं. 

त्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस सुद्धा सुंदर नक्षीकाम तर उरलेल्या कळसाच्या एका थरावर काही मूर्त्याही दिसतात.



पण ह्या मंदिरच खर वैशिष्ठ आहे तर गाभाऱ्याच्या दरवाज्यावर कोरलेले मकर तोरण. ह्या अर्धवर्तुळाकार तोरणाची सुरवात दरवाज्याचा खांबांपासून होते. दोन्ही खांबावर दोन मकर असून दरवाज्यावर गंधर्व कीचक ह्यांचे तोरण आहे आणि मध्यावर कीर्तिमुख आहे. मकराच्या शेपटीची नक्षी बनवण्यात आलेली आहे. नैसर्गिक झीज सोडली तर हे तोरण फारच अप्रतिम दिसत असणार




मंदिराच्या आजूबाजूस काही ढसाळलेली दगड ही दिसतात. गोंदेश्वर आणि आयेश्वर दोन्ही मंदिरामध्ये मुलं अभ्यास करतांना दिसली आणि खरोखरच ह्या दोन्ही मंदिरा मधलं वातावरण सुद्धा खूपच शांत असतं. हे अप्रतिम मंदिर बघून मग आम्ही गोंदेश्वर मंदिर बघायला निघालो

आयेश्वर मंदिर - गुगल नकाश्यावर 


Reference: ह घी सांकलिया ह्यांचे पुस्तक “महाराष्ट्रातील पुरातत्व”






No comments:

Post a Comment