अहमदाबाद पासून १८ किमी अंतरावर अडालज बावडी / वाव हा पुरातन हिंदू जल नियोजनाचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. ही विहीर १४९८ साली बांधली गेली आहे आणि आज ही ह्या बांधकामात दिसणारे दगडी नक्षीकाम थक्क करून टाकतं. आपली अनेक प्रेक्षणीय स्थळे जशी लोकांनी रंगवून किंवा आपली नावं कोरून वगैरे खराब केलेली असतात तसे नशिबाने इथे काही झालेले दिसत नाही. गुजराथ प्रदेशात अश्या अनेक वाव आढळतात, ह्या चौफेर भटकंतीच्या ट्रीप मध्ये नवलाख वाव, बाबा हरेर कि वाव आणि अडालज वाव ह्या तीन स्टेपवेल बघता आल्या. पण ह्या तिन्ही विहिरीत अडालज ची विहीर कलेच्या दृष्टीने खूपच उजवी आहे. पाण्याचे व्यवस्थापन आणि जनतेस अथवा राजाघारण्यास पाण्याची उपलब्धता, ह्या कारणांनी ह्या अनेक विहिरी गुजराथ परिसरात बांधलेल्या आढळतात. आणि मग पुढे ह्या विहिरी थोड्या धार्मिक तर थोड्या अलंकारिक बनत गेल्या असाव्या
अडालज कि वाव हि अहमदाबाद पासून जवळ आहे आणि इथे जायला अहमदाबाद पासून वाहतूक व्यवस्था आहे. शेअर रिक्षा पासून ते राज्य सरकारच्या बस वगैरे पर्याय आहेत पण सतत नाहीत. स्वत:चे वहान असल्यास उत्तम. अडालज विहीर, त्रीमंदीर, वैष्णावदेवी मंदिराची प्रतिकृती, इंदोरा नेचर पार्क आणि अक्षरधाम मंदिर असा एक दिवसाचा प्रोग्रॅम बनवता येतो. अक्षरधाम मंदिर शेवट ठेवल्यास रात्रीचा लाईट शो सुद्धा बघून अहमदाबाद मुक्कामी परत येऊ शकता.
अडालज बावडी / वाव बघायची इच्छा खूप दिवस होती. त्या विहिरी च्या नक्षीकामाबद्दल ऐकलेलं होतं. तिथे पोचलो तेव्हा एक परदेशी लोकांचा ग्रुप तिथून आवक होऊन बाहेर पडत होता. त्यातला एक सांगत होता की असलं नक्षीकाम बघायला नशीब लागतं, बरं झालं आपण भारतात आलो. आणि मला आपल्या पर्यटन विभागाची पंच लाईन आठवली. “अतुल्य भारत” खरोखर मला ह्या देशात इतकं काही बघायला आणि तुप्त व्हायला आहे की एक जीवन पुरणार नाही. खरोखरीच हा अतुल्य भारत आहे. इतकं भावनिक व्हायला कारण आहे हि अडालज बावडी. हिंदू मुस्लिम कलेचा थक्क करणारा नमुना आहे ही विहीर. जमिनी खाली ५ माजली विहीर आणि ती ही एखाद्या प्रसादासारखी नटलेली आहे.
ह्या अप्रतिम विहिरीचा इतिहास ही काही साधासुधा नाही ह्या विहिरीचे बांधकाम सुरु केलं ते राणा वीर सिंग ह्याने, पण ही विहीर पूर्ण होण्यापूर्वीच राणा वीर सिंग च्या राज्यावर सुलतानी आफत आली. ह्या राज्याला त्या वेळी नाव होतं दांडी देश आणि ह्या राणा वीर सिंग च्या राज्यावर हल्ला करणारा सुलतान होता महम्मद बेगडा, ज्याचं संपूर्ण नाव होतं अबुल नसीर-उद-दिन महम्मद शहा प्रथम, हा अत्यंत आक्रमक सुलतान होता. अहमदाबाद शहर वासवणाऱ्या अहमद शहा प्रथम चा हा नातू. सुलतान महम्मद बेगडा ने पुढे अनेक वर्ष गुजराथ प्रदेशावर राज्य केलं. स्वत:ला सुलतान अल-बर्र आणि सुलतान अल-बह्र अश्या पदव्या धरण करणाऱ्या ह्या सुलतानने त्याच्या पुढच्या राज्य कालावधीत अनेक अप्रतिम बांधकामं ही उभारली, त्यातले एक बांधकाम म्हणजे चंपानेर, जे आज UNESCO च्या संरक्षण यादीत आहे. जामी मस्जिद, सरखेज रोजा आणि अडालज वाहिरी चे उर्वरित काम ही अनेक बांधकामांपैकी काही बांधकामे ह्या सुलतानाच्या राज्यकालात झाली.
विहिरीला तीन प्रवेश आहेत जे पहिल्या मजल्यावर एकत्र येतात. हा अष्टकोनी मजला आणि त्यात कोरलेल्या चार ग्यालाऱ्या दगडी नक्षीकामाने अक्षरश: भरून टाकल्या आहेत. संपूर्ण विहीर वाळूजान्य दगडापासून बनलेली आहे. विहिरीचे बांधकाम दक्षिणोत्तर केलेलं आहे. एकूण पाच माजले जमिनी खाली बांधले आहेत आणि खालच्या मजल्यावर पाण्याजवळ तापमान साधारण ५-6 डिग्री से कमी होतं. विहिरीची बांधणी करतांना सूर्य प्रकाश सरळ पाण्यावर पडणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे. वरील कथे प्रमाणे विहिरीचे बांधकाम हिंदू आणि मुसलमान दोन्ही राजवटीत झाल्याने त्याचा शिक्का विहिरीतील नक्षीकामांवर सहज दिसतो. विहीर केवळ पावसाचे पाणी साठवत नाही तर जमिनीतील पाण्याच्या साठ्यापर्यंत जाते. विहिरीत धार्मिक चिन्हे सुद्धा कोरली आहेत जेणेकरून विहिरीतील वातावरण पवित्रमय राहावे.
विहिरीला लागून असलेल्या देवीच्या मंदिराचा गाभारा संपूर्ण रंगीत काचेच्या तुकड्यांनी सजवलेला आहे. आणि त्यात काही पौराणिक कथांचे दृश्यं बघायाला मिळतात
विहिरीच्या वरती काही कबरी सारखे बांधकाम बघायला मिळते. असं म्हणतात की महमद सुलतानानी विहिरीचे बांधकाम करणाऱ्या प्रमुख कारागिरांना अशीच अजून एक विहिरी बांधता येऊ शकते का ? असं विचारलं आणि त्यांनी होकार दिला. त्याचं बक्षिस म्हणजे ह्या त्यांच्या कबरी आहेत. पण हि केवळ एकीव कथा आहे.
ह्या अप्रतिम विहिरीला प्रवेश शुल्क नाही. विहीर सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत बघण्यास उघडी असते असं समजलं. तुमच्या अहमदाबाद प्रवासात जे चूकवी नये असे हे एक पर्यटन स्थळ आहे.
गुगल नकाश्यावर अडालज ते अहमदाबाद पर्यंतचा मार्ग दाखवला आहे
No comments:
Post a Comment