इंदौर हे मध्यप्रदेशातील एक महत्वाचे शहर आणि ह्या शहरात मानाने उभ्या असेलेल्या काही इतिहासील वस्तूंपैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे होळकर वाडा, शिवरायांचा मावळा गगनभरारी घेत निघाला आणि त्याने राज्यविस्तार करता करता भारतात अनेक प्रमुख शहरात आपले बस्तान बसवले, थोरल्या बाजीरावांनी अचूक हेरलेल्या काही वीरांपैकी एक होते हे होळकर. अटकेपार घोडी फेकण्याबरोबर विस्तारत चालेल्या राज्याची घडी मोडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी मराठी सैनिक तैनात केले गेले आणि तिथे त्यांच्या सरदारांचे राजवाडे उभे राहिले. बडोद्याला गायकवाड, ग्वाल्हेरला शिंदे (आत्ताचे सिंधिया) तसेच इंदौर चे हे सरदार होळकर.
मल्हारराव होळकर ह्यांनी स्वराज्यनिर्माण कामात सिंहाचा वाटा उचलला. श्रीमंत बाजीरावांबरोबर अनेक लढाया जिंकल्या. सन १७३८च्य पालखेडच्या प्रसिद्ध लढाईत सुद्धा पेशव्यांबरोबर मल्हारराव होते. सतत मोहिमेवर असलेल्या होळकरांनी कुटुंब एका ठिकाणी स्थिर राहिले तर कुटुंबाची काळजी राहणार नाही आणि लढाया संपूर्ण मानसिक विवंचने शिवाय लढता येतील म्हणून शाहू महाराजांकडे शब्द टाकला. हि जहांगिरी ची मागणी शाहू महाराजांनी मान्य केली आणि श्रीमंत बाजीरावांशी सल्ला मसलत करून मल्हार रावांच्या पत्नी सौ गौतामाबाई होळकर ह्यांना खाजगी जहांगिरी प्रदान केली. सन १७३४ ला बहाल केलेल्या ह्या खाजगी जहांगिरीत मालवा, खान्धेश मधील अनेक गावांबरोबर इंदौर चा ही समावेश होता. आणि मग होळकरांचे कुटुंब इंदौरला स्थिर झाले. पुढील काही वर्ष हि मंडळी खाननदी काठी राहिली आणि साधारण सन १७४७ ला ह्या राजवाड्याचे काम चालू झाले. ह्या राजवाड्याने मराठ्यांचा पानिपतात झालेला प्रभाव ऐकला आणि सन १७६५ ला पानिपत युद्धाचे दु:ख ना पचवता मल्हाररावांनी जगाचा निरोप घेतला आणि मग राजकारण पहिले, अनेक शासक पहिले. मराठ्यामधले आपसी वैर पहिले. होळकरांमधील अंतर्गत गृहयुद्ध ही पहिले.
मल्हाररावांनंतर अहिल्याबाई होळकरांनी राजधानी महेश्वरला जरी हलवली तरी इंदौर ही होळकरांची प्रमुख लष्करी छावणी म्हणून कायम राहिली. त्यानंतर चे शासक यशवंतराव होळकरांच्या काळात मात्तबर मराठे सरदार शिंदे आणि होळकरा यांच्यामधील दुही विकोपाला गेली आणि होळकरांनी उज्जैन वर हल्ला केला आणि बदला म्हणून शिंदेंचे सेनापती सर्जेराव घाटगे ह्यांनी इंदौर वर हल्ला केला. राजवाड्याचे अतोनात नुकसान झाले, मल्हाररावांनी त्यांचा खजिना वाड्यात लपवला आहे असे समजून वाडा खोदून काढला गेला. पुढे इंग्रजांशी पराभव पत्करावा लागल्यावर इंदौर ला पुन्हा होळकरांची राजधानी करण्यात आले. होळकरांचे प्रधानमंत्री तात्या जोग ह्यांनी राजवाडा पुन्हा बांधून काढला, ते बांधकाम सन १८१८ ते १८३३ इतके चालले. राजवाड्यात दगडी आणि लाकडी अश्या दोन्ही प्रकारची बांधकामे आहेत. सन १८३४ ला राजवाड्याला लागलेल्या आगीमुळे एक मजला जळून गेला. पुढे सन १९८४ साली शीखांविरुद्ध दंगलीत हा राजवाडा सामाजाकंटकांकडून पुन्हा जाळला गेला. असे अनेक घाव अंगावर घेत उभा असलेला हा वाडा
विविध काळात आणि वेगवेगळ्या लोकांकडून राजवाड्याचे काम झाल्यामुळे इथे मोगल, मराठा, राजपूत आणि फ्रेंच बांधकाम शैलीचे एकत्रीकरण झालेले पाहायला मिळते. ७ माजली उंच वाड्याचे खालचे तीन माजले दगडी बांधकामाचे आहेत तर वरचे मजले लाकडाच्या बांधकामाचे आहेत. जाळीदार नक्षीकाम आणि लाकडी ग्यालेरी अप्रतिम दिसते. भक्कम मराठा शैलीच्या दरवाजातून आत गेलं की मधला चौक लागतो आणि समोर एक मजली दगडी बांधकाम आहे तिथे खाली श्री गजाननाचे मंदिर आणि वरती दरबार हॉल आहे.
डावीकडील इमारतीत पहिल्या मजल्यावर होळकरांच्या काळातील वास्तू, शस्त्र , गालिचे, भांडी तसेच काही ऐतिहासिक कागद पात्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यशवंत होळकरांच्या काळात त्यांचे पेशव्यांशी सुद्धा विसंतुष्ट वाढले होते. पुढे नाना साहेब पेशव्यांना इंग्रजांशी बंड केल्या कारणाने पकडण्यासाठी होळकरांकडून एक लाख रुपये बक्षिस जाहीर करण्यात आले होते तो १८५८ सालचा दस्तावेज ही ह्या प्रदर्शनात मांडला आहे. तसेच होळकर वंशाचा इतिहास आणि राजवाड्याची ऐतिहासिक माहिती सुद्धा लोकांसाठी उपलब्ध आहे. राजवाड्यासमोर एक लहानसा पण सुंदर बगीचा असून तिथे अहिल्यादेवी होळकरांचा सुंदर पुतळा आहे.
हा राजवाडा २५० वर्ष्याच्या इंदौर आणि माळवा इतिहासाचा खडा साक्षीदार आहे. आणि नक्की बघावा असा आहे. राजवाड्याच्या प्रवेशासाठी रु १० आणि कॅमेरा साठी रु. २५ अशी फी आकारली जाते.
राजवाडा आवर्जून बघावा असाच आहे रात्री विद्युत रोषणाई केलेला राजवाडा तर फारच खुलून दिसतो. इंदौर रेल्वे स्टेशन राजवाडा जवळ आहे, अगदी चालत गेलात तर अधी कृष्णापुरा छत्री बघून थोडी विश्रांती घेऊन राजवाड्यावर येऊ शकतात. राजवाड्या बाहेर गर्दीचे मार्केट आहे. खाण्यापिण्याच्या गाड्याही ह्या परिसरात भरपूर आहे.
इंदौर राजवाड्याचे ठिकाण गुगल नकाश्यात दाखवले आहे .
No comments:
Post a Comment