Search This Blog

Showing posts with label Haveli/palace. Show all posts
Showing posts with label Haveli/palace. Show all posts

Saturday, December 19, 2015

होळकर राजवाडा - Holkar Palace, Indore



इंदौर हे मध्यप्रदेशातील एक महत्वाचे शहर आणि ह्या शहरात मानाने उभ्या असेलेल्या काही इतिहासील वस्तूंपैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे होळकर वाडा, शिवरायांचा मावळा गगनभरारी घेत निघाला आणि त्याने राज्यविस्तार करता करता भारतात अनेक प्रमुख शहरात आपले बस्तान बसवले, थोरल्या बाजीरावांनी अचूक हेरलेल्या काही वीरांपैकी एक होते हे होळकर. अटकेपार घोडी फेकण्याबरोबर विस्तारत चालेल्या राज्याची घडी मोडू नये म्हणून मोक्याच्या ठिकाणी मराठी सैनिक तैनात केले गेले आणि तिथे त्यांच्या सरदारांचे राजवाडे उभे राहिले. बडोद्याला गायकवाड, ग्वाल्हेरला शिंदे (आत्ताचे सिंधिया) तसेच इंदौर चे हे सरदार होळकर.



मल्हारराव होळकर ह्यांनी स्वराज्यनिर्माण कामात सिंहाचा वाटा उचलला. श्रीमंत बाजीरावांबरोबर अनेक लढाया जिंकल्या. सन १७३८च्य पालखेडच्या प्रसिद्ध लढाईत सुद्धा पेशव्यांबरोबर मल्हारराव होते. सतत मोहिमेवर असलेल्या होळकरांनी कुटुंब एका ठिकाणी स्थिर राहिले तर कुटुंबाची काळजी राहणार नाही आणि लढाया संपूर्ण मानसिक विवंचने शिवाय लढता येतील म्हणून शाहू महाराजांकडे शब्द टाकला. हि जहांगिरी ची मागणी शाहू महाराजांनी मान्य केली आणि श्रीमंत बाजीरावांशी सल्ला मसलत करून मल्हार रावांच्या पत्नी सौ गौतामाबाई होळकर ह्यांना खाजगी जहांगिरी प्रदान केली. सन १७३४ ला बहाल केलेल्या ह्या खाजगी जहांगिरीत मालवा, खान्धेश मधील अनेक गावांबरोबर इंदौर चा ही समावेश होता. आणि मग होळकरांचे कुटुंब इंदौरला स्थिर झाले. पुढील काही वर्ष हि मंडळी खाननदी काठी राहिली आणि साधारण सन १७४७ ला ह्या राजवाड्याचे काम चालू झाले. ह्या राजवाड्याने मराठ्यांचा पानिपतात झालेला प्रभाव ऐकला आणि सन १७६५ ला पानिपत युद्धाचे दु:ख ना पचवता मल्हाररावांनी जगाचा निरोप घेतला आणि मग राजकारण पहिले, अनेक शासक पहिले. मराठ्यामधले आपसी वैर पहिले. होळकरांमधील अंतर्गत गृहयुद्ध ही पहिले. 


मल्हाररावांनंतर अहिल्याबाई होळकरांनी राजधानी महेश्वरला जरी हलवली तरी इंदौर ही होळकरांची प्रमुख लष्करी छावणी म्हणून कायम राहिली. त्यानंतर चे शासक यशवंतराव होळकरांच्या काळात मात्तबर मराठे सरदार शिंदे आणि होळकरा यांच्यामधील दुही विकोपाला गेली आणि होळकरांनी उज्जैन वर हल्ला केला आणि बदला म्हणून शिंदेंचे सेनापती सर्जेराव घाटगे ह्यांनी इंदौर वर हल्ला केला. राजवाड्याचे अतोनात नुकसान झाले, मल्हाररावांनी त्यांचा खजिना वाड्यात लपवला आहे असे समजून वाडा खोदून काढला गेला. पुढे इंग्रजांशी पराभव पत्करावा लागल्यावर इंदौर ला पुन्हा होळकरांची राजधानी करण्यात आले. होळकरांचे प्रधानमंत्री तात्या जोग ह्यांनी राजवाडा पुन्हा बांधून काढला, ते बांधकाम सन १८१८ ते १८३३ इतके चालले. राजवाड्यात दगडी आणि लाकडी अश्या दोन्ही प्रकारची बांधकामे आहेत. सन १८३४ ला राजवाड्याला लागलेल्या आगीमुळे एक मजला जळून गेला. पुढे सन १९८४ साली शीखांविरुद्ध दंगलीत हा राजवाडा सामाजाकंटकांकडून पुन्हा जाळला गेला. असे अनेक घाव अंगावर घेत उभा असलेला हा वाडा


विविध काळात आणि वेगवेगळ्या लोकांकडून राजवाड्याचे काम झाल्यामुळे इथे मोगल, मराठा, राजपूत आणि फ्रेंच बांधकाम शैलीचे एकत्रीकरण झालेले पाहायला मिळते. ७ माजली उंच वाड्याचे खालचे तीन माजले दगडी बांधकामाचे आहेत तर वरचे मजले लाकडाच्या बांधकामाचे आहेत. जाळीदार नक्षीकाम आणि लाकडी ग्यालेरी अप्रतिम दिसते. भक्कम मराठा शैलीच्या दरवाजातून आत गेलं की मधला चौक लागतो आणि समोर एक मजली दगडी बांधकाम आहे तिथे खाली श्री गजाननाचे मंदिर आणि वरती दरबार हॉल आहे. 



डावीकडील इमारतीत पहिल्या मजल्यावर होळकरांच्या काळातील वास्तू, शस्त्र , गालिचे, भांडी तसेच काही ऐतिहासिक कागद पात्रांचे प्रदर्शन मांडले आहे. यशवंत होळकरांच्या काळात त्यांचे पेशव्यांशी सुद्धा विसंतुष्ट वाढले होते. पुढे नाना साहेब पेशव्यांना इंग्रजांशी बंड केल्या कारणाने पकडण्यासाठी होळकरांकडून एक लाख रुपये बक्षिस जाहीर करण्यात आले होते तो १८५८ सालचा दस्तावेज ही ह्या प्रदर्शनात मांडला आहे. तसेच होळकर वंशाचा इतिहास आणि राजवाड्याची ऐतिहासिक माहिती सुद्धा लोकांसाठी उपलब्ध आहे. राजवाड्यासमोर एक लहानसा पण सुंदर बगीचा असून तिथे अहिल्यादेवी होळकरांचा सुंदर पुतळा आहे. 


हा राजवाडा २५० वर्ष्याच्या इंदौर आणि माळवा इतिहासाचा खडा साक्षीदार आहे. आणि नक्की बघावा असा आहे. राजवाड्याच्या प्रवेशासाठी रु १० आणि कॅमेरा साठी रु. २५ अशी फी आकारली जाते.


राजवाडा आवर्जून बघावा असाच आहे रात्री विद्युत रोषणाई केलेला राजवाडा तर फारच खुलून दिसतो. इंदौर रेल्वे स्टेशन राजवाडा जवळ आहे, अगदी चालत गेलात तर अधी कृष्णापुरा छत्री बघून थोडी विश्रांती घेऊन राजवाड्यावर येऊ शकतात. राजवाड्या बाहेर गर्दीचे मार्केट आहे. खाण्यापिण्याच्या गाड्याही ह्या परिसरात भरपूर आहे. 

इंदौर राजवाड्याचे ठिकाण गुगल नकाश्यात दाखवले आहे .





Saturday, November 21, 2015

तांबेकर वाडा - Tambekar Wada


तांबेकर वाड्याबद्दल ऐकून होतो त्यातील प्रसिद्ध भित्ती चित्र बघायची इच्छा ही होतीच आणि म्हणूनच ह्या चौफेर भटकंती च्या ट्रीपमध्ये तांबेकर वाडा आठवणीने प्रोग्राममध्ये ठेवला. गुजराथ टुरिझम च्या साईटवर जरी ह्या वाड्याची नोंद असली तरी तिथे गर्दी नसते हे समजलं होतं पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा फक्त आमचाच ग्रुप तिथे होता. तांबेकर वाड्याचा रस्ता दाखवणारा कुठलाही बोर्ड वगैरे नाही तेव्हा विचारात विचारात जावं लागतं आणि कमाल म्हणजे त्या भागात देखील खुपश्या लोकांना वाड्याच्या नक्की जागे बद्दल माहिती नाही. म्हणूनच महितीच्या शेवटी गुगल नकाश्यात तांबेकर वाडा दाखवला आहे. गुगल नकाश्यावर सुद्धा अजून हा वाडा मार्क नाही, ती पण रिक्वेस्ट गुगल मेकरवर टाकली आहे. इथल्या रस्त्याचे नाव मात्र तांबेकर रोड असं आहे.







बाहेरून दर्शनी भाग जरी उत्तम आणि ठीकठाक दिसत असला तरी वाड्याच मागचा भाग ढासळला आहे. नशिबाने पुढचा भाग हा आता अर्केलोजीकॅल विभागाकडे आहे आणि तेथील भित्ती चित्रासाठी प्रसिद्ध माजले व्यवस्थित ठेवलेले आहेत.  सयाजी राजांकडे दिवाण म्हणून महत्वाच्या हुद्द्यावर असलेले भाऊ तांबेकर (विठ्ठल खंडेराव तांबेकर ) ह्याच्या रहिवासाचे हे ठिकाण. G +३  असलेली ही हवेली बाहेरून अगदीच साधारण वाटत असली तरी आतून रंगांची उधळण करत समोर येते.  हवेलीच्या डावीकडून वरती जाण्यासाठी जिना आहे आणि तिथेच पुरातत्व विभागाने हवेलीची माहिती लावली आहे. त्यानुसार १८४९ ते १८५४ ह्या सहा वर्षात भाऊ तांबेकरांचे हे निवासस्थान होते. वर जाणारे जिने खूपच चढे आहेत आणि गुढगा दुखीवाल्यांची परीक्षा पाहणारे आहेत पण एकदा का तुम्ही पहिल्या मजल्यावर पोचलात की  सर्व काही रंगांमध्ये विसरून जाल हे निश्चित. पहिल्या मजल्यावर दर्शनी हॉल  नजरेचं पारण  फेडतो. 





अर्थात पुरातत्व विभागाने ताब्यात घेण्यापूर्वी दुर्लक्षित राहिलेला हा वाडा असल्याने चित्रांना थोडी फार क्षति पोचलेली आहे पण जे शिल्लक आहे ते हि आपल्या कल्पने पलीकडले आहे. ह्या हॉल मध्ये विविध देवी देवता तसेच अनेक ऐतिहासिक प्रसंग चित्रित केलेले आहेत आणि विशेष म्हणजे फक्त भिंती नाही तर दरवाजे खिडक्या ही चित्रांनी सजवलेल्या आहेत. संपूर्ण लाकडी खांब आणि विटांचे बांधकाम केलेला हा वाडा तुम्हाला अचंबित करून सोडतो . हॉल ला लागून डावीकडे अनेक दरवाजे आहेत जे तुम्हाला ग्यालरीत आणि वरच्या मजल्यावर नेतात तर हॉल  च्या समोर सुंदर लाकडी जाळी  आहे. ह्या जाळीवर देखील रंगांची उधळण आहेच 


इतके फोटो आणि रंगसंगती टाकता येतील की  विचारू नका. इथे रामायण महाभारतातले अनेक प्रसंग चित्रले आहेत तर मराठा इंग्रज युध्दाचे प्रसंग हि हॉल मध्ये दिसतात. तर काही चित्र जी युरोपीअन शैलीतली आहेत.
दुसऱ्या मजल्यावर ही  परत एकदा चढ्या जिन्याशी झटापट करून पोचावे लागते. इथे ही  दोन खोल्या आहेत आणि  बाहेरची मोठी खोली मध्ये भित्ती चित्र नाही. पण लागून असलेल्या दुसऱ्या खोलीत परत अप्रतिम चित्र आहेत. हे जर वेगळ वाटलं  म्हणून अजून चौकशी केली तर मिळालेली माहिती धक्कादायक होती 

पूर्वी इथे शाळा भरायची आणि मग मुलं चित्रांशी खेळायची म्हणून भिंती स्वच्छ पांढऱ्या रंगाने रंगवून टाकल्या. ते ऐकून एकदम खिन्न झाल्यासारखं वाटल. अप्रतिम भित्ती चित्र नष्ट झाली आणि त्यावर चढला पंधरा शुभ्र रंग जो आता पिवळा पडला आहे. माहिती तिथे समजलेली आहे पण भिंती नीट  पहिल्या तर आजही मागचे रंग नजरेला जाणवतात. आतली खोली मात्र अप्रतिम आहे . विविध धर्माच्या लोकांचे पेहराव. काही युरोपीअन चित्र देव देवता. श्री कृष्णाची रासलीला, त्याचे बालपण तसेच मराठी स्त्री वगैरे चित्रले आहे. 

इथे वापरलेले रंग हे सोन्याच्या किमतीचे आहेत अस समजल आणि दारावर नक्षीकामासाठी हस्तिदंताचा उपयोग केला आहे. ही  हवेली प्रचंड पैसे खर्चून नटवलेली आहेच पण येथली चित्रकला केवळ अनमोल आहे. हवेली अत्यंत साफ आणि नीट नेटकी ठेवणारे कर्मचारी वर्ग तुम्हाला मदत हि करतात. एकंदरीत हा अमुल्य ठेवा तुम्ही नक्की जाऊन बघावा असाच आहे 


येथे साधारण ३०० भित्ती चित्र उरली आहेत.  आणि उरलेली हवेली कोसळण्याच्या स्थितीत आहे. ह्या रस्त्यावर बरीच मराठी नावं  असलेले वाडे आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातून आलेले लोक त्याकाळी एकत्रित इथे राहत असावे. हा वाद सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत उघडा असतो. पण वाड्यात लाईट नाहीत, तेव्हा संध्याकाळी उशिरा जाऊ नका. ह्या हवेलीला प्रवेश फी सुद्धा नाही आहे 





आणि एक नम्र विनंती आहेत.  हा अमुल्य ठेवा आपणच जपायचा आहे. तिथे लाईट नाहीत कारण भित्ती चित्रांना क्षती  पोचू नये म्हणून  तेव्हा तुम्ही फोटो काढाल तर कृपया फ़्लाश वापरू नका. भले फोटोला लाईट कमी का पडे ना 

तांबेकर वाडा  गुगल नकाश्यावर दाखवला आहे