मुंबईच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा विशाल जलदुर्ग मदतीची हाक मारत उभा आहे. विशाल ह्या साठी की हा किल्ला ११० एकर वर्ग इतक्या क्षेत्रफळावर पसरलेला आहे. पूर्वी ह्या किल्ल्याच्या तीन बाजुंना पाणी / दलदल असायची पण आता समुद्र काही किमी आत सरकला आहे आणि किल्ला समुद्र तीरी वसल्यासारखा दिसतो. किल्ल्याभावती तिवराच जंगल दिसतं. आणि किल्ल्याला लागून उभी राहिलेली बांधकामं. किल्ल्यामध्ये बघण्यासारख्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत तसेच दुर्लक्षित राहिल्यामुळे किल्ल्यात दाट जंगलाचा भाग हि आहे. आता ही वेडीवाकडी वाढलेली झाडं, वेली इथल्या अमूल्य ऐतिहासिक वास्तूंना वेढा घालून बसल्या आहेत ज्यामुळे ह्या पुरातन बांधकामाची वेगाने क्षती होत आहे. किल्ल्यात ताडीची झाडं उगवली आणि तो धंदा ही जोरात चालू आहे म्हणूनच म्हटलं की हा अप्रतिम किल्ला मदतीची हाक मारत उभा आहे.

ह्या किल्ल्यामार्फत मासे, जातिवंत घोडे, जहाज बांधणी असे अनेक व्यवसाय भरभराटीस आले होते. पोर्तुगीजांच्या भरभराटी बरोबरच भूमिपुत्रांवर होणारे अतोनात अत्याचार आणि जबरदस्तीने चालेली धर्मपरिवर्तन सुद्धा ह्या किल्ल्याला पहावी लागली. १५४८ साली पोर्तुगीज संत फ्रान्सिस्को झेविर ह्या किल्ल्यात उतरला होता आणि त्याकाळात प्रचंड लोकांचे धर्मपरिवर्तन केले गेल्याची नोंद इतिहासात आहे.

जोसेफ चर्च हे १५४६ ला बांधलं गेलं, घंटेसाठी बांधलेला मनोरा, तटबंदीला लागून असलेले हे चर्च त्याच्या मागच्या दराने तटबंदी कडे जायला दगडी शिड्या हि आहेत. एक मोठी कमान अजून शाबूत आहे आणि त्यावर आतून पोर्तुगीज पद्धतीची नक्षी आहे आणि समोर उंच मनोरा. त्यावर जायचा जिना ही मोडकळीस आला तरी शाबूत आहे. काही बंद केलेल्या खिडक्या आहेत. हे चर्च नंतर बरेच बदलेले असावे असं वाटतं. चर्च समोर दाट जंगल आणि ताडीची झाडं ही आहेत. बाजूच्या तटबंदी वरून समुद्राचे रूप बघायला मिळतं.
इथून हा रस्ता पुढे बालेकिल्ल्याकडे जातो हा मोठा परिसर आणि पाणी, शस्त्र भांडार आणि अनेक दगडी खोल्या असलेला बालेकिल्ला आहे. ह्याचा दरवाजा पडका आहे आणि इथे हि एका दरवाजा नंतर वळून दुसरा दरवाजा लागतो. विस्तीर्ण परिसर, जाड दगडी भिंती आणि बालेकिल्ल्याला लागून आहे नोस्सा सेन्होरा चर्च हे साधारण १५३५ साली बांधलं म्हणजे बालेकील्ल्यासोबातच ह्याचं काम सुरु झालं असावं. बाहेरील तटबंदी ही १५३६ नंतर बनवली गेली.
बालेकिल्ल्याचा एक बुरुज जरा ठीक रुपात उभा आहे आणि जवळच स्नानगृह, न्यायालय आहे तसाच नागेश्वर मंदिर आहे. पुढे कारागृह, हॉस्पिटल ह्याचे अवशेष
पुढे भव्य पण पडीक डोमिनिक चर्च, जे संत गोन्कॅलो च्या नावाने १५८३ ला बांधण्यात आलं, एकंदरीतच पोर्तुगीजांनी चर्च आश्रम ह्याच्या माध्यमातून धर्मप्रचाराचा जोर वाढवत नेला होता. हे चर्च आणि त्याला लागुनच असलेला आश्रम फारच मोठा आहे अर्थात हे सगळं आता भग्नावस्थेत बघायला मिळतं
ह्या चर्चला लागून डांबरी रस्ता जातो तो ओलांडला की भव्य चिमाजी अप्पा ह्याचे स्मारक. अप्रतिम पुतळा आणि त्यावर विराजमान योद्धा. खरोखर अप्रतिम कलाकृती आहे, अर्थात अलीकडचीच पण अभिमानाने मन भरून यावं अशी
ह्या रस्त्याने वसईकडे चालत निघालो की बाजूला कवायतीचे मैदान आणि पलीकडे अजून खंबीर उभी तटबंदी दिसते आणि हा रस्ता जिथून किल्ल्या बाहेर निघतो त्याच्या डाव्या वाजूला दिसतो एक खुष्कीचा मार्ग. अक्षरश: ह्या दरवाजातून गेलं की गोल फिरत चिचोळ्या वाटेने किल्ल्यात प्रवेश आहे. इथे आता मध्ये एक मारूतीच मंदिर आहे पण ते पूर्वी नसणार. ह्या दरवाज्यातून शत्रू आला तर अगदी हातावर मोजता येतील इतके सैनिक शेकडोच्या सैन्याला अडवून धरू शकतात अशी ह्या मार्गाची ठेवण आहे. हा दरवाजा आतून मात्र नक्षीकामाने नटला आहे किंवा असं म्हणू की इथे थोडे नक्षीकाम शिल्लक आहे.
ह्या दरवाज्याचा वरच्या बाजूला गेलं तर आपण फत्ते बुरुजावर जातो तिथे झेंडावंदनाची सोय आहे, बहुदा ठराविक कार्यक्रमाच्या वेळी इथे सरकारी झेंडावंदन हल्ली होत असावं
फत्ते बुरुजावरून समोर दिसत ते फ्रान्सिकन चर्च , हे सुद्धा प्रशस्त चर्च आहे आणि त्यात पोर्तुगीज राज्यासाठी काम करणाऱ्या वीर योध्याच्या कौतुकासाठी एक खास व्यवस्था आहे. ह्या चर्चच्या दगडी जमिनीवर थडग्याचे दगड नावासहित लावलेले आहेत, त्यावर त्या वीरा च नाव आणि काही पोर्तुगाल चिन्ह त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून लावलेले दिसतात. ह्या चर्च ची कमान आणि एकंदरीत बांधणी बघता हे नक्कीच एक अतिभव्य चर्च असणार ह्याची खात्री पटते. चर्च शेजारी आश्रम हि आहे
पुढे अजून काही चर्च काही पडीक घराचे अवशेष, जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष असं अजूनही बरच बघण्यासारखं आहे. दहा बुरुजांचा हा भव्य किल्ला वाचवण आणि जतन करणं अत्यंत महत्वाचं वाटत. काही वर्षपूर्वी इथे अनेक महत्वपूर्ण गोष्टी उत्खालनात सापडल्या त्यात काही विरगळ हि आहेत .

चिमाजी अप्पा आणि त्यांच्या सोबत लढणाऱ्या सर्व वीरांचे आणि स्वभूमी परत मिळवण्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या १२०० वीर मराठ्यांचे विचार मानत घोळवत हि भटकंती संपते.
वसई स्टेशन पासून रिक्षा आणि लोकल बस ची उत्तम सुविधा आहे ज्याने तुम्ही किल्ल्याच्या मधोमध पोहचू शकता. स्वत:चे वहान असल्यास किल्ल्यात वाहनाने हि फिरता येतं. किल्ला जमिनीवर असल्याने कुठे उंच चढाई नाही. ह्या किल्ल्याला एकदा भेट देणं नक्कीच गरजेचं आहे.
खाली नकाश्यामध्ये वसई किल्ल्यातली प्रेक्षणीय स्थळे मार्क केली आहेत.
No comments:
Post a Comment