Search This Blog

Monday, May 11, 2015

अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)





मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.

मंदिराचे बांधकाम साधारण शके ९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची बांधणी केलेली आहे. 





काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, शंकराची मूर्ती ,पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शंकर पार्वती विवाह, हंसा वर आरूढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, त्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही  शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे. 



मंदिराच्या दरवाजात दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे.





मंदिराचे कोरीव काम हे खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे.  हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता येते.  दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात . 



मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.

मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो.  अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.

इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते

अम्बरेश्वर मंदिर गुगल नकाश्यावर : -



No comments:

Post a Comment