Search This Blog

Tuesday, May 19, 2015

गोंदेश्वर हेमाडपंथी मंदिर - Gondeshwar Temple


नाशिक जवळ सिन्नर ला एक अप्रतिम हेमाडपंथी मंदिर आहे हे एकून होतो आणि म्हणूनच ह्या मे महिन्यात थोडा वेळ काढून ह्या मंदिराकडे मोर्चा वळवला. नाशिक शिर्डी रस्त्यावर असलेल्या सिन्नर गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला हे मंदिर आहे. गावातून जायला रस्ता आहे म्हणून गाडी घेउन आत शिरलो पण रविवारी बाजाराचा दिवस असतो आणि हे माहित नसल्याने भरपूर वेळ इकडून तिकडून फिरलो आणि परत हायवे वर आलो कारण रस्त्यांनवर इतकी दुकानं मांडली होती की कार ने मंदिरापर्यंत पोचण शक्यच नव्हत. मग चौकशी आणि गुगल काकांच्या मार्गदर्शना प्रमाणे गावाला वळसा घालून मंदिरा जवळ पोचलो. मंदिरात ७-८ मुलं मंदिरातील शांततेच फायदा घेत अभ्यास करत बसली होती 


सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर हे एक शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिर परिसरात प्रवेश केला की अक्षरशः भारावून जायला होतं. मंदिरा भवती तटबंधी आहे. मंदिर परिसर ही अगदी स्वच्छ होता. मंदिरात शिरताना दगडी दारावरील नक्षीकामच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत. दारातून प्रवेश केला की दगडी खांब आणि समोर येणाऱ्या उजेडात गोंदेश्वर मंदिरच पाहिलं दर्शन घडतं. 


मंदिरा समोर मोठी मोकळी जागा ही आहे आणि डावीकडे दगडी बांधकाम आहे. बहुदा ह्या खोल्या पुजाऱ्यासाठी किंवा मंदिराला भेट द्यायला येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बनवल्या असाव्या. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना म्हणून ह्या मंदिराकडे बोट दाखवता येईल 



मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. उंच आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे आणि अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. प्रमुख मंदिरा भवती असलेली इतर मंदिरं सुद्धा अप्रतिम कोरीवकाम दर्शवतात. गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे. आणि गाभाऱ्यातच्या दारावर अतिशय बारीक आणि सुबक नक्षीकाम केलेलं आहे . 







मंदिराच्या बाहेर अनेक देवीदेवतांची शिल्प बघायला मिळतात. 
संपूर्ण मंदिराभावती हत्तींची शिल्प कोरलेली आहेत जसे की ह्या हत्तींनी हे मंदिर उभारून पाठीवर तोलालय. मंदिराच्या बाजूला एक मोठा पाण्याचा तलाव ही आहे.


 हे मंदिर नक्कीच खास जाऊन भेट देण्यासारखं आहे. रथसप्तमीला सूर्यपूजा थाटामाटात साजरी होते अशी माहिती मिळाली.  ह्या मंदिरा  जवळच असलेलं अर्येश्वर मंदिर आणि गारगोटी म्युझियम हे देखील नक्की बघा

नाशिकहून येतांना आडवा  फाट्यावर डावीकडे वळलं की लगेच आयेश्वर मंदिर लागतं ते लहानसं मंदिर बघून गोंदेश्वर कडे जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवलेला आहे. पण जर रविवारी जाणार असाल तर गावात बाजार भरतो तेव्हा हायवे वरून गावाला वळसा घालून गोंदेश्वर मंदिरात जाल तर उत्तम


3 comments: