Search This Blog

Wednesday, May 13, 2015

लोनाड चे प्राचीन शिव मंदिर - Lonad Shiv Temple


लोनाड ची बौद्धकालीन लेणी बघून (खांडेश्वरी देवी मंदिर)  बघून पुढच्या मंदिरा केडे मोर्चा वळवला. लेण्यांची टेकडी उतरलो आणि मूळ रस्त्याला लागलो की समोर मोट्ठे पाईप दिसतात. थोडं डावीकडे वळलो की लगेच समोर लोनाड गावात जायचा रस्ता दिसतो. हे लहानसं गाव आहे त्यामुळे रस्तेसुद्धा छोटे छोटे आहेत. साधारण ५-७ मिनिटं बाईक ने गावात गेल्यावर एका प्राचीन दगडी मंदिरा जवळ पोचलो. हेच ते शिलाहार कालीन शिव मंदिर. 



हे मंदिर साधारण ११व्य शतकातलं असावं पण मंदिर मात्र पार मोडकळीस आलेलं आहे. मंदिराचा गाभारा आणि आतील शिवलिंग हेच काय ते जरा ठीक परीस्थित आहेत. व्हरांडा, सभामंडप, कळस हे सगळं पडलं आहे, त्याचे अवशेष मंदिरा बाजूला विखुरलेले दिसतात.  आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या दगडांवर कपडे वाळत घातले होते. एक आजोबा एका मोठ्याश्या आडव्या दगडावर आडवे झाले होते, ते आमच्या केडे "कुठून आली हि ब्याध" अश्या चेहऱ्याने बघून परत कुशी बदलून झोपले. काही लहान मुलं त्या पडीक मंदिराच्या ढासळत चालेल्या एका मोठ्या दगडाखाली आनंदात खेळत होती


आम्ही प्रथम शिवदर्शानासाठी गाभाऱ्यात शिरलो. गाभारा हा साधारण पाच सहा मोठ्या पायऱ्या उतरून मग खाली आहे. शंकराची पिंड आणि त्या समोर नंदी हे गाभाऱ्यातच आहेत. अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. त्यामानाने गाभारा स्वच्छ ही होता आणि रोजची पूजा ही होत असावी कारण विड्याच्या पानावर काही नेवेद्य वाहिलेला दिसला. नंदी चा चेहरा पार झिजून गेलेला आहे तर मूळ पिंडी शेजारी एक लहानशी काळी पिंड सुद्धा आहे पण ती मूळ गाभाऱ्या मधील नसावी. गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर ऑईल पेंट ने मोठ्ठा ओम काढला आहे. कश्यासाठी ते काही कळलं नाही. तसाच ओम आणि गाभाऱ्याच्या बाहेर ही काढलेला आहे 


गाभाऱ्याचे छतावर आतून साधीशी नक्षी आहे पण आता त्यातली फारच कमी नक्षी दिसते कारण दगडाची झीज झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाढत चालेल्या भेगा स्वच्छ दिसतात.




मंदिराची पडझड बघून वाईट ही वाटतं.  त्वरेने जर काही उपाय योजना केली गेली नाही तर हा इतिहासाचा अमूल्य ठेवा संपूर्ण भुईसपाट होईल.


मंदिराच्या डावीकडे सुद्धा एक शिवलिंग बघायला मिळतं पण ते तिथे नंतर ठेवल्यासारखं वाटतं



मंदिराच्या दगडाची वाढती झीज ह्यामुळे मंदिराभोवातीच्या शिल्पातीला कलाकुसर मनासारखी टिपता येत नाही. अर्थात ह्या मंदिरावरचे नक्षीकाम हे हि तसे साधेसे आहे.  मंदिराच्या मागे एका तलाव आहे. आणि बाजूच्या शेतात एक शिलालेख ही सापडला आहे पण ते आम्हाला नंतर कळलं आणि तो बघायचा राहिला. तो शिलालेख प्रदर्शांत हलवायची योजना होती पण गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे ती प्रत्यक्षात आणली गेलेली नाही. आजुबाजीला विखरलेले मंदिराचे अवशेष बघून आणि शंकराचरणी परत एकदा नतमस्तक होऊन आम्ही परतीची वाट धरली. नेहमी प्रमाणे मनात तोच प्रश्न की एवढी अवाढव्य आणि अप्रतिम मंदिरं हजारो वर्षा पूर्वी बनवलीच कशी असतील. त्या सर्व अज्ञात कलाकारानाही शतशः प्रणाम




लोनाड चे प्राचीन शिव मंदिर - गुगल नकाश्यावर 




No comments:

Post a Comment