Search This Blog

Saturday, November 21, 2015

तांबेकर वाडा - Tambekar Wada


तांबेकर वाड्याबद्दल ऐकून होतो त्यातील प्रसिद्ध भित्ती चित्र बघायची इच्छा ही होतीच आणि म्हणूनच ह्या चौफेर भटकंती च्या ट्रीपमध्ये तांबेकर वाडा आठवणीने प्रोग्राममध्ये ठेवला. गुजराथ टुरिझम च्या साईटवर जरी ह्या वाड्याची नोंद असली तरी तिथे गर्दी नसते हे समजलं होतं पण जेव्हा आम्ही गेलो तेव्हा फक्त आमचाच ग्रुप तिथे होता. तांबेकर वाड्याचा रस्ता दाखवणारा कुठलाही बोर्ड वगैरे नाही तेव्हा विचारात विचारात जावं लागतं आणि कमाल म्हणजे त्या भागात देखील खुपश्या लोकांना वाड्याच्या नक्की जागे बद्दल माहिती नाही. म्हणूनच महितीच्या शेवटी गुगल नकाश्यात तांबेकर वाडा दाखवला आहे. गुगल नकाश्यावर सुद्धा अजून हा वाडा मार्क नाही, ती पण रिक्वेस्ट गुगल मेकरवर टाकली आहे. इथल्या रस्त्याचे नाव मात्र तांबेकर रोड असं आहे.







बाहेरून दर्शनी भाग जरी उत्तम आणि ठीकठाक दिसत असला तरी वाड्याच मागचा भाग ढासळला आहे. नशिबाने पुढचा भाग हा आता अर्केलोजीकॅल विभागाकडे आहे आणि तेथील भित्ती चित्रासाठी प्रसिद्ध माजले व्यवस्थित ठेवलेले आहेत.  सयाजी राजांकडे दिवाण म्हणून महत्वाच्या हुद्द्यावर असलेले भाऊ तांबेकर (विठ्ठल खंडेराव तांबेकर ) ह्याच्या रहिवासाचे हे ठिकाण. G +३  असलेली ही हवेली बाहेरून अगदीच साधारण वाटत असली तरी आतून रंगांची उधळण करत समोर येते.  हवेलीच्या डावीकडून वरती जाण्यासाठी जिना आहे आणि तिथेच पुरातत्व विभागाने हवेलीची माहिती लावली आहे. त्यानुसार १८४९ ते १८५४ ह्या सहा वर्षात भाऊ तांबेकरांचे हे निवासस्थान होते. वर जाणारे जिने खूपच चढे आहेत आणि गुढगा दुखीवाल्यांची परीक्षा पाहणारे आहेत पण एकदा का तुम्ही पहिल्या मजल्यावर पोचलात की  सर्व काही रंगांमध्ये विसरून जाल हे निश्चित. पहिल्या मजल्यावर दर्शनी हॉल  नजरेचं पारण  फेडतो. 





अर्थात पुरातत्व विभागाने ताब्यात घेण्यापूर्वी दुर्लक्षित राहिलेला हा वाडा असल्याने चित्रांना थोडी फार क्षति पोचलेली आहे पण जे शिल्लक आहे ते हि आपल्या कल्पने पलीकडले आहे. ह्या हॉल मध्ये विविध देवी देवता तसेच अनेक ऐतिहासिक प्रसंग चित्रित केलेले आहेत आणि विशेष म्हणजे फक्त भिंती नाही तर दरवाजे खिडक्या ही चित्रांनी सजवलेल्या आहेत. संपूर्ण लाकडी खांब आणि विटांचे बांधकाम केलेला हा वाडा तुम्हाला अचंबित करून सोडतो . हॉल ला लागून डावीकडे अनेक दरवाजे आहेत जे तुम्हाला ग्यालरीत आणि वरच्या मजल्यावर नेतात तर हॉल  च्या समोर सुंदर लाकडी जाळी  आहे. ह्या जाळीवर देखील रंगांची उधळण आहेच 


इतके फोटो आणि रंगसंगती टाकता येतील की  विचारू नका. इथे रामायण महाभारतातले अनेक प्रसंग चित्रले आहेत तर मराठा इंग्रज युध्दाचे प्रसंग हि हॉल मध्ये दिसतात. तर काही चित्र जी युरोपीअन शैलीतली आहेत.
दुसऱ्या मजल्यावर ही  परत एकदा चढ्या जिन्याशी झटापट करून पोचावे लागते. इथे ही  दोन खोल्या आहेत आणि  बाहेरची मोठी खोली मध्ये भित्ती चित्र नाही. पण लागून असलेल्या दुसऱ्या खोलीत परत अप्रतिम चित्र आहेत. हे जर वेगळ वाटलं  म्हणून अजून चौकशी केली तर मिळालेली माहिती धक्कादायक होती 

पूर्वी इथे शाळा भरायची आणि मग मुलं चित्रांशी खेळायची म्हणून भिंती स्वच्छ पांढऱ्या रंगाने रंगवून टाकल्या. ते ऐकून एकदम खिन्न झाल्यासारखं वाटल. अप्रतिम भित्ती चित्र नष्ट झाली आणि त्यावर चढला पंधरा शुभ्र रंग जो आता पिवळा पडला आहे. माहिती तिथे समजलेली आहे पण भिंती नीट  पहिल्या तर आजही मागचे रंग नजरेला जाणवतात. आतली खोली मात्र अप्रतिम आहे . विविध धर्माच्या लोकांचे पेहराव. काही युरोपीअन चित्र देव देवता. श्री कृष्णाची रासलीला, त्याचे बालपण तसेच मराठी स्त्री वगैरे चित्रले आहे. 

इथे वापरलेले रंग हे सोन्याच्या किमतीचे आहेत अस समजल आणि दारावर नक्षीकामासाठी हस्तिदंताचा उपयोग केला आहे. ही  हवेली प्रचंड पैसे खर्चून नटवलेली आहेच पण येथली चित्रकला केवळ अनमोल आहे. हवेली अत्यंत साफ आणि नीट नेटकी ठेवणारे कर्मचारी वर्ग तुम्हाला मदत हि करतात. एकंदरीत हा अमुल्य ठेवा तुम्ही नक्की जाऊन बघावा असाच आहे 


येथे साधारण ३०० भित्ती चित्र उरली आहेत.  आणि उरलेली हवेली कोसळण्याच्या स्थितीत आहे. ह्या रस्त्यावर बरीच मराठी नावं  असलेले वाडे आहेत. एकंदरीत महाराष्ट्रातून आलेले लोक त्याकाळी एकत्रित इथे राहत असावे. हा वाद सकाळी ८:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत उघडा असतो. पण वाड्यात लाईट नाहीत, तेव्हा संध्याकाळी उशिरा जाऊ नका. ह्या हवेलीला प्रवेश फी सुद्धा नाही आहे 





आणि एक नम्र विनंती आहेत.  हा अमुल्य ठेवा आपणच जपायचा आहे. तिथे लाईट नाहीत कारण भित्ती चित्रांना क्षती  पोचू नये म्हणून  तेव्हा तुम्ही फोटो काढाल तर कृपया फ़्लाश वापरू नका. भले फोटोला लाईट कमी का पडे ना 

तांबेकर वाडा  गुगल नकाश्यावर दाखवला आहे 






































Wednesday, October 7, 2015

कास पठार - kaas plateau - UNESCO Site




कास पठार म्हणजे निसर्ग मित्रांचे नंदनवन, ऑगस्ट , सप्टेंबर महिन्यात फुलणारे फुलांचे गालिचे, विविध रंगाची, आकाराची फुलं म्हणजे फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांचा जणू कुंभमेळा. नजरेचं पारण फिटणे ह्या म्हणीचा आशय  खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचा असेल तर कास पठारावर ह्या काळात एकदा नक्की जावे.

सोनकी - Graham's groundsel
कास पठार हे UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे. UNESCO च्या जागतिक वारसा स्थळाचे दोन प्रकार आहेत १) सांस्कृतिक वारसा स्थळे २) नैसर्गिक वारसा स्थळे. साल २०१२ ला भारताच्या पश्चिम घाटाला जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला त्यात ३९ जागांचे संवर्धन गरजेचे ठरले त्यातली एक महत्वपूर्ण जागा आहे “कास पठार”. ह्या पठारावर ८५० प्रकारची विविध फुले फुलतात. International Union for Conservation of Nature and Natural Resources ( IUCN ) हि संस्था जगातील विविध पशु तसेच वनस्पती ह्यांच्या विविध प्रजातींचा अभ्यास करून ज्या प्रजातींचा ऱ्हास होतो आहे त्याची एक रेड लिस्ट प्रकाशित करते, त्या प्रजातींचे संवर्धन अत्यंत गरजेचे असते अश्या ह्या रेड लिस्ट मधील साधारण ३९ फुले हि कास पठारावर अस्तित्त्वात आहेत. ही माहिती देण्याचे कारण की कास पठार बघतांना आपल्याला किती जबाबदारीने ह्या फुलांचं आनंद घ्यायचा आहे हे समजू शकेल. ह्या वेगाने ऱ्हास होणाऱ्या प्रजातींना आपल्याकडून नुकसान होणार नाही ह्या जबाबदारीची जाणीव ठेवून कास पठार फिरायला हवे. Aponogeton satarensis (वायातुरा) नावाची अति दुर्मिळ वनस्पती कासला आढळते ती बघायला मिळाण नशिबाचा भाग आहे. आमचं नशीब इतकं ही जोरावर नव्हतं पण ही वनस्पती केवळ साताऱ्यात आढळते म्हणूनच तिच्या नावात हि satarensis असा उल्लेख दिसतो 

साताऱ्या पासून साधारण २५ कि मी वर महाराष्ट्राचे valley of flowers, कास पठार आहे. कासला जाणारा रस्ता, घाटात उतरलेले ढग, हिरवागार शालू नेसून आपल्या स्वागताला जणू तयार निसर्ग आणि फुलांच्या रंगांची उधळण हे बघत आम्ही सकाळी ८:०० पर्यंत कास ला पोचलो. गर्दी टाळायची असेल आणि सुट्टी हातात असेल तर आठवड्याच्या मधल्या दिवसात कासला जावे कारण शनिवार रविवार तिथे जणू जत्रा भरते. कार पार्किंग इतक्या दूर करावी लागेल की फुलांपर्यंत पोचताच दामायला होईल. पण कास खरोखर बघायचं असेल तर भरपूर भटकायची तयारी करून जाणं गरजेच आहे. 




कास तलाव - Kas Pond
कास ला किती वेळ लागेल हे संपूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण फुलांबरोबरच विविध फुलपाखरं, पक्षी सुद्धा बघायला मिळतात. कास ला जायला काही बसेस पण आहेत साताऱ्याहून पण स्वत:चे वहान हा खरच जास्त सोयीस्कर पर्याय आहे जेणे करून तुम्ही कास पठारावर जास्त वेळ देऊ शकता. रात्री उशिरा साताऱ्यात धडकून आणि मुक्काम करून सकाळी कास पठार असा कार्यक्रम आम्ही आखला होता. आणि साताऱ्यात पोचलो तो जो मुसळधार पाऊस सुरु झाला कि उद्याची फुलांच्या दुनियेत जायची स्वप्न हा पाऊस वाहून नेतो की काय अशी काळजी वाटायला लागली पण पहाटे उठलो ते स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र निळे आकाश बघत

Panoramic view from kaas Plateau

साताऱ्यात राहण्यासाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत, तसेच MTDC मान्यताप्राप्त राहण्याच्या व्यवस्था कास पठारा पासून जवळ उपलब्ध आहेत. “कास पुष्प यात्री निवास” त्यासाठी संपर्क : श्री विठठल किरदात , भ्रमणध्वनी - 8291008666, 9594934666, 8080077606, 9420488392  
 
Malabar Lark - मलबारी चंडोल

कास पठार कातळ खडकाचे असून, माती व अन्न द्रव फार कमी प्रमाणात आहे. हे पठार अग्निजन्य खडकापासून बनलेले आहे. पण त्याच बरोबर येथील वातावरण शेकडो रानफुलांना पोषक असं आहे आणि ह्या अग्निजन्य खडकावरही जणू स्वर्ग अवतरतो.









पूर्वी कास पठारावर मुक्त भटकंती शक्य होती पण पर्यटकांनी भरभरून नुकसान करायला सुरुवात केली. प्लास्टिक पिशव्या, कचरा वाढू लागला. प्रेयसी चे फोटो फुलात बसून काढणाऱ्या प्रेमवीरांना आपल्या प्रेयसी / बायको पेक्षा ही रानफुलं नाजूक आहेत हे कदाचित समजलं नाही. मुलांना बगीचात खेळायला आणल्यासारखे फुलात बागडायला सोडणारे  पालक ही दिसू लागले. फोटोग्राफी करण्याच्या नादात फुलांच्या बहरात कॅमेरा घुसावणारे फोटोग्राफर दिसू लागले. आणि मग नाईलाजाने सरकारला कास पठारला कंपाउंड घालावं लागलं आता निर्धारित रस्त्यावरून चालत पठार बघावं लागतं तरी हि ह्या कंपाउंड मधूनही फुलात शिरणारे वीर ह्या देशात दिसतात. आपण जेव्हा कास ला भेट द्याल तेव्हा ह्या गोष्टीची नक्की काळजी घ्याल ह्याची खात्री आहे


सध्या कास ला पार्किंग शुल्क आणि प्रवेश शुल्क आकारले जाते. कधी कधी कॅमेरासाठी सुद्धा शुल्क आकारतात ह्या पैश्यातून पठार संवर्धनासाठी कामे तसेच जवळच्या गावांत काही कामे केली जातात. सातारा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे आणि तुम्ही कास च्या जोडीला जवळची अनेक पर्यटन स्थळे करू शकता. चार पूर्ण दिवस सातारा परिसराची पिकनिक ठरवू शकता

कास मध्ये मिळालेले काही फुलांचे फोटो इथे टाकतो आहे.


Lambert's Borage - हिरवी निसुर्डी

Vigna vexillata - हळुंदा, रानघेवडा
Neanotis lancifolia - तारागुच्छा














Impatiens oppositifolia  - तेरडा
Curcuma caulina - चवर


Habenaria foliosa - उग्र हबेअमरी
Water Willow - करंबल



Nimphoides Indicum- कुमुदिनी
Pogostemon deccanensis - जांभळी मंजिरी




Solanum xanthocarpum - काटे रिंगणी
Strobilanthes callosus - कारवी


Konkan Pinda - पंद, पेंद

दीपकाडी - Dipcadi montanum
Cyanotis Cristata - नभाळी
सोनकी - Graham's groundsel













































































साताऱ्याहून कास पठारावर जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवला आहे

Sunday, September 27, 2015

बारा मोटाची विहीर - Bara Motachi Vihir







सातारा आणि परिसर हा पर्यटकांना नक्कीच आकर्षित करणारा परिसर आहे. कास पठार, अजिंक्यतारा, सज्जन गड, ठोसेगरचा धबधबा आणि असं बरच काही पण त्याच बरोबर काही प्रसिद्धी पासून दूर राहिलेली तरीही नक्की भेट द्यावी अशीही काही ठिकाणं साताऱ्या परिसरात आहेत. ह्या अश्या काहीश्या दुर्लक्षित ठिकाणांपैकी एक आहे “ बारा मोटाची विहीर ”. हि एक प्रचंड अष्टकोनी विहीर का बांधली गेली ? कोणी बांधली? आणि आज तिची स्थिती काय आहे ? असे अनेक प्रश्न मनात होते जेव्हा मला ह्या पुरातन विहिरी बद्दल माहिती मिळाली आणि योगायोगाने लवकरच ही अप्रतिम कलाकृती बघण्याचा योग आला.

मी आणि आमचे भटकंतीत रमणारे काही मित्र कास पठारावर निसर्गाने मांडलेले रान फुलांचे गालिचे आणि केलेली रंगांची उधळण बघायला गेलो होतो आणि मग परततांना ह्या बारा मोटाच्या विहीरीला ही अगदी ठरवून गेलो. काही माहिती होती तर एक पूर्वी जाऊन आलेला जाणकार मित्र ही बरोबर होता. साताऱ्याहून पुण्याकडे येतांना साधारण साताऱ्यापासून १७ किमी अंतरावर लिंब नावाचं एक लहानसं गाव आहे. विहिरी पर्यंत जाणारा रस्ता ही कच्चा आहे पण गाडीने अगदी विहिरी जवळ जाता येते. हल्ली गावात विहिरीचा रस्ता दाखवणारे दिशादर्शक फलक ही लावलेले आहेत 


शाहू महाराजांना वयाच्या ७ व्या वर्षापासून औरंगजेबाने नजरकैदेत ठवले होते आणि त्यांना राजा म्हणून मान्यताही दिली होती, त्यांना ७ हजारी मनसब बहाल झाली होती पण स्वराज्याचा राजा कैदेत होता. शाहू महाराज कैदेत असतांना शाहू महाराजांचा विवाह मानसिँहराव रुस्तूमराव जाधवराव यांचि कन्या अबिँकाबाई / राजसबाई यांच्याशी झाला होता त्या दुर्दैवाने काही काळाने तेथेच वारल्या, त्यांच्यासोबत वीरुबाई आंदण दिल्या होत्या. पुढे औरंगजेबाच्या मृत्युनंतर शाहू महाराजांची सुटका करण्यात आली जेणेकरून भोसले कुटुंबीयात राज सिंहासनासाठी आपसी वैमनस्य वाढून त्याचा फायदा मोगलांना मिळावा. पण शाहू महाराजांना अनेक जुन्या सरदारांची साथ मिळाली आणि ते १२ जानेवारी १७०८ रोजी सिंहासनाधीश्वर झाले. सातारा स्वराज्याची राजधानी झाली. साताऱ्यापासून साधारण १७ कि मी अंतरावरील लिंबू गावात शाहु महाराजांनी देशभरातून विविध आंब्याची कलम आणून एक सुंदरशी आमराई वसवली होती आणि मग ह्या आमराई ला लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी राणी वीरुबाईनी हि अप्रतिम विहीर स्वता:च्या देखरेखीत बनवून घेतली होती





त्याचा उल्लेख वरील शिलालेखात सापडतो (श्री सौभाग्यवती वीरुबाई साहेब ) ह्या विहिरीचे बांधकाम ५ वर्ष ३ महिने चालले. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार साधारण नोव्हेबर १७१९ ला चालू झालेले हे बांधकाम फेब्रुवारी १७२५ ला पूर्ण झालं (शके कार्तिक वद्य त्रयोदशी शक १६४१ ते फाल्गुन वद्य द्वितीया शक १६४६). ह्याची नोंद विहिरीच्या प्रमुख द्वाराजवळील शिलालेखावर दिसते. शिलालेखावरील अक्षरे जुळवत वाचून हे समजते. इथेला शिलालेखाचा फोटो अक्षरे जोडून टाकला आहे. ह्या शिलालेखामाध्ये बहुदा विष्णूचा वराह अवतार कोरला आहे पण तो तितकासा स्पष्ट दिसत नाहीप्रमुख जिन्याशी असलेल्या ह्या शिलालेखा खालून विहिरीकडे जाणारा प्रमुख जिना उतरतो तो आपल्याला उपविहिरीत घेऊन जातो आणि समोर दिसते पालखीसारखी एक लहान खोली जिथे जायचा रस्ता मात्र समाजत नाही. हि आहे राजेसाहेबांची विश्रांती आणि प्रसंगी गुप्त खलबतची खोली. इथे 


जायला अत्यंत चिंचोळा जिना विहिरीच्या डावीकडून आहे. ह्या खोलीतील खांब नक्षीने सजवलेले आहेत. तिथे पडदे बगैरे लावण्यासाठी लोखंडी हुक आज ही शाबूत आहेत. ह्या खोली खालून गेलो की दिसते प्रमुख विहीर जी भव्य आहे आणि अगदी दुष्काळी परिस्थितीतही १२ महिने पाणी असतं जे आजही लिंब गावाला हिरवागार ठेवतय. ह्या अष्टकोनी प्रमुख विहिरीला ९ मोटा आहेत. आणि उप विहिरीला ६ मोटा लावलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत १५ मोटा पण बहुदा ३ मोटा ह्या जादाच्या व काचित प्रसंगी वापरत घेत असाव्या म्हणून ह्याला बारा मोटाची विहीर म्हणून ओळखतात असं समजलं. विहिरी पर्यंत पोचण्याचे दगडी जिने अजूनही अगदी मजबूत दिसतात, एकंदरीत ही विहीर उत्तम परिस्थितीत आहे म्हणूनच प्रेक्षणीय ही आहे.





प्रमुख विहिरीच्या भिंतींवर सिंह शिल्प आहेत आणि काही शिल्पामध्ये सिंह चर हत्तींना पायदळी तुडवतो आहे जे चार पातशाह्या मारल्याचे चिन्ह आहे तर उत्तरेकडे झेपावणारे सिंह दिल्ली केडे झेपावत आहेत अस मानलं आहे. खरोखरीच बाजीरावांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं होत. 







एका दरवाजावर दोन्ही बाजूला शरभ शिल्प ही आहेत. शरभ हा काल्पनिक प्राणी अनेक संस्कृत उताऱ्यामध्ये नोंदवला आहे जो सिंह हत्तीपेक्षा ही सामर्थ्यवान मनाला जातो. तसेच महाल आणि इतर दरवाज्यांवर पुष्प चिन्हे ही कोरली आहेत.







उपविहीर आणि मूळ विहिरीच्या मधोमध जो छोटाखानी महाल आहे त्याच्या बरोबर वरती सिंहासनाची जागा आहे, अर्थात सिंहासन वगैरे नाही आता पण जेव्हा शाहू महाराज आमराईत येत तेव्हा ह्याच ठिकाणी बसून गावकऱ्याशी चर्चा , न्यायनिवाडा करत 

एकंदरीतच ही वास्तू फारच छान आणि मस्त वाटते. एकतर गुजराथमध्ये जश्या कलाकुसरीने युक्त आणि प्रचंड अश्या बाव (विहिरी) आहेत तश्या महाराष्ट्रात फारश्या नाहीत पण हि विहीर साधीशी पण सुस्थितीत आहे. 

ह्या विहिरीच्या समोर मात्र एक लहानसं मंदिर आहे, अगदी वडाच्या झाडाला खेटून पण नवलाची गोष्ट म्हणजे त्या मंदिराला कळस नाही. मंदिरा बाहेर लहानसा नंदी ही विराजमान आहे. कळस नसलेल्या मंदिराचं रहस्य काही उलघडलं नाही. गावात अजून ही काही पुरातन मंदिरं आहेत त्यातील एका कोटेश्वर मंदिराच्या दर्शनाला आम्ही गेलो होतो त्याची माहिती ही ब्लॉगवर टाकतोच आहे.





सातारा ते बारा मोटाची विहीर हा रस्ता गुगल नकाश्यात दाखवला आहे .


Tuesday, July 21, 2015

हुमायूनचा मकबरा - Humayun Tomb - UNESCO Site





हुमायून हा बाबर नंतर चा दुसरा मोगल सम्राट होता ज्याचं मूळ हे अफगाणिस्थान मधलं, १५३१ साली वडिलांकडून मिळालेलं राज्य हुमायून टिकवू शकला नाही. त्याच्या सावत्र भावांनी त्याच्या राज्याचे लचके तोडले आणि पुढे शेर शहा सुरी ने होमायुनचा संपूर्ण पराभव केला आणि त्याला राज्य सोडून मदतीसाठी पळावं लागलं, पुढे १५ वर्षांनी इराणच्या राज्याच्या मदतीने त्याने भारतात गमावलेलं राज्य परत मिळवलं. १९५६ साली त्याच्या मृत्यू नंतर दिल्लीच्या पुराना किल्यात हुमायून राजाला दफन केलं गेलं पण हेमू राजाने दिल्लीवर स्वारी करून किल्ला हस्तगत केला त्यापूर्वी हुमायून राजाच्या पार्थिवाला कबरीतून बाहेर काढून पंजाबला कलानौर ला परत दफन केलं गेलं पुढे हुमायून राजाचा मुलगा अकबर ने राज्य सांभाळल्यावर हुमायून राजाची पहिली पत्नी बेग बेगम ने आपल्या पतीच्या स्मरणार्थ विशाल स्मारक बनवलं तोच हा हुमायून मकबरा. मिरक मिर्झा घियास ह्या स्थापत्य विशारदाच्या अधिपात्यात हा मकबरा बांधला गेला आहे. मग हुमायून राजाच्या पार्थिवाला पंजाब मधून पुन्हा काढून इथे दफन केलं गेलं 


हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन पासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर मथुरा रोड वर हा हुमायूनचा मकबरा आहे. लाल वाळूच्या खडकापासून बांधलेली इतकी मोठी अशी ही पहिलीच वस्तू. हुमायून ची ही कबर भारतीय उपखंडात बांधली गेलेली पहिली भव्य कबर म्हणावी लागेल. ह्या इमारतीत अनेक राजघराण्यातील लोकांच्या कबरी आहेत ज्यामाध्ये बेग बेगम (जीने हे स्मारक उभारलं), हमीद बेगम तसाच हुमायून चा पणतू दारा शिकोह ह्याचं सुद्धा दफन करण्यात आलं. दारा शिकोह हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ ज्याला शहाजहान ने आपला वारसदार जाहीर केलं होतं पण औरंगजेबाने राज्यप्राप्तीसाठी आपला भाऊ दारा शिकोह ला मारून टाकलं अशी नोंद इतिहासात आहे. मोगलांचा शेवटचा राजा बहाद्दूर शहा जाफर ह्यला इंग्रजांनी इथूनच धरून रंगूनला हद्दपार केलं होतं. ह्या इमारतीचं बांधकाम हुमायून च्या मृत्युनंतर ९ वर्षांनी (सन १५६५) सुरु झालं ते १९७२ पर्यत सुरु होतं. जी आज युनेस्को च्या जागतिक वारसा च्या यादीत सामाविष्ट केलेली आहे. भारतात युनेस्को च्या जागतिक वारस यादीतील साधारण ३२ ठिकाण आहेत त्यातलीच ही एक वस्तू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी २०१० मध्ये या माकाबऱ्याला भेट दिली होती.

हुमायून चा मकबरा ३० एकर पसरलेल्या चार बाग बगिच्या मध्ये एका प्रचंड अश्या चौथऱ्यावर उभारला आहे ह्या चौथऱ्याची उंची ७ मिटर एवढी आहे आणि वर जाण्याचा दगडी जिना एकदम चढा आहे. गुढगा दुखावणारा हा जिना चढून गेलं की समोर मकबरा दिसतो, सध्या पश्चिमेकडचा मार्ग खुला ठेवल्या ने मकाब-या मध्ये जायला फिरून जावं लागतं

पण त्यापूर्वी डावीकडे चौथऱ्यावरच अनेक संगमरवरी कबरी उघड्या म्हणजे आकाश्या खाली दिसतात. मकबरा हा दोन माजली असून तो पिवळ्या काळ्या संगमरवरापासून बनवलेला आहे. त्यावरील डोम पर्शियन पद्धतीचा असून मकबरा ४७ मिटर उंच आहे . अतिशय प्रशस्थ अशी ही वस्तू असून नक्षीकाम अप्रतिम आहे.


संगमरवरात कोरलेल्या जाळ्या तर थक्क करून टाकणाऱ्या आहेत. अष्टकोनी मधल्या खोलीत हुमायूनची संगमरवरी कबर आहे तर आजूबाजूच्या खोल्यांमध्ये राजघराण्यातील इतरांच्या कबर घडवलेल्या दिसतात. अर्थात खऱ्या कबरी ह्या तळ घरात असून तिथे जायला बंदी आहे. सुदैवाने काही साफसफाई च्या कामानिमित्त उघडलेल्या बेसमेंटला बघता आलं. मूळ कबरी ह्या साध्याश्या आहेत आणि वर स्थापलेल्या दर्शनाच्या कबरी मात्र उत्तम नक्षीकामासह आहेत. ह्या मकबरा परिसरात साधारण १०० कबरी आहेत पण सगळ्यांवर नाव न कोरल्याने बऱ्याच कबरी नक्की कोणाच्या हे समजत नाही 

निजामुद्दीन स्टेशन पासून अगदी जवळ आहे तिथून रीक्ष्या बसेस उपलव्ध आहेत. तिकीट : १० रुपये आणि फोटो कॅमेरासाठी वेगळं तिकीट नाही. आत गेल्यावर डाव्याबाजूला लहानसं उपहारगृह ही आहे. कमीत कमी साधारण २ तासाचा वेळ हुमायून मकबरा आणि आजूबाजूची स्मारकं बघायला लागतो. ह्यामध्ये बु हलीमा चा मकबरा, इसा खान चा मकबरा, अफसरावाला मकबरा, नीला घुमबाद वगैरे आहेत. दिल्लीदर्शन सहलीत हुमायून मकबरा हे एक महत्वाचं ठिकाण म्हणून पर्यटकांना दाखवण्यात येतं




हुमायूनचा मकबरा तसेच आजूबाजूची ठिकाणे गुगल नकाश्यावर 

Thursday, July 2, 2015

घोडबंदरचा किल्ला - Ghodbandar Killa

घोडबंदरचा किल्ला :

ठाणे शहरापासून जवळच उल्हास नदीच्या काठावर घोडबंदर किल्ला शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. ऐतिहासिक वस्तू ह्या जतन करण्यापेक्षा त्या दुर्लक्ष करण्याकडे आपला सगळ्यांचा कल असतो हे घोडबंदर किल्ला बघितला की प्रकार्ष्याने जाणवते. पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज असा खांदेपालट बघता बघता हा किल्ला एकेकाळी इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय ही होता. पण आता किल्याची अवस्था फारच दैनीय आहे . मागे काही वर्षापूर्वी ह्या किल्याची डागडुजी करून हा किल्ला एक पर्यटक आकर्षण बनवायचे प्रयत्न केले गेले असं ही ऐकलं पण ते पूर्ण फेल गेलेलं दिसून येत


पोर्तुगीज ठाण्यात आल्या नंतर त्यांनी ह्या किल्ल्याची बांधणी सुरु केली ती साधारण १५५० साली, अरबी घोड्यचा व्यापार ह्या बंदरातून व्हायचा म्हणून हे घोडबंदर आणि ते सुरक्षित राहावे म्हणून हा घोडबंदर किल्ला 
नंतर ह्या किल्ल्यात काहीना काही भर पडत राहीली ती १७३० पर्यंत. ह्या किल्ल्याचे नाव Cacabe de Tanna असं  ठेवलं होता त्यांनी. 


ह्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांनी एक चर्च बांधलं होतं ती वस्तू आज ही उभी आहे. जिथे कालांतराने एक हॉटेल मग कार्यालय आणि आता ओसाड खोल्या आहेत. आतील भिंत आणि जमिनी पूर्णपणे नवीन वाटतात, म्हणजे त्या आहेतच फक्त मूळ बांधकाम आणि दरवाजा पोर्तुगीज बांधणी दर्शवतो. 

ह्या चर्च च्या बाहेर एक मस्त वडाचं झाड आहे आणि त्या झाडावर ८-१० माकड भरदुपारी अगदी शांत झोपली होती. आमचं लक्ष सहज वर गेलं तर ही सतत धिंगाणा घालणारी माकड शांत झोपलेली दिसली. मी खरतर झाडावर झोपलेली माकड पहिल्यांदाच बघत होतो.

हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांकडून ही बरेच प्रयत्न झाले होते. १६७२ साली शिवाजी महाराजाच्या सैन्याला ही अपयश पचवावं लागलं होतं. पोर्तुगीजांचे सशक्त आरमार आणि आधुनिक शस्त्रास्त्रे ह्या जोरावर दिव दमण, वसई ते गोवा पर्यंत मुलुख मारला होता आणि जनतेवर जबरदस्ती धर्मांतर लादले जाऊ लागले. ती तक्रार छत्रपतीकडे गेली आणि मग पोर्तुगीजांना धडा शिकवायची कामगिरी थोरल्या बाजीरावांनी उचलली आणि त्यांचे धाकले बंधू चिमाजी अप्पा ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना पोर्तुगीजांवर चालून गेली. घोडबंदर किल्ला हा १७३७ साली मराठ्यांच्या ताब्यात आला. हा किल्ला आणि साष्टी बेट हे दोन्ही १०-१५ दिवसाच्या युद्धानंतर मराठांच्या हाती लागलं आणि पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून इथली जनता मुक्त झाली. पुढे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला आणि तेथे इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय वसवले.


किल्यामध्ये हल्ली काही दगडी कमानीचे अवशेष बाकी आहेत त्याच्या पुढे मोकळी जागा आहे. कमानी जवळ एक बुरुज आहे जिथे जायला लहानश्या दरवाजातून दगडी पाहिऱ्या आहेत. ह्या बुरुजावरून खाडी आणि बाजूचा हिरवागार निसर्ग अप्रतिम दिसतो. किल्ल्याच्या एका बाजूला गोडाऊन सारख्या चौकोनी खोल्या आहेत. पण त्याच्यावरचं छप्पर मात्र उडून गेलेल आहे 


किल्ल्याच्या मध्ये पाण्याचं मोठे टाकं आहे आणि त्याला पाण्याचा जिवंत प्रवाह आजही ही आहे त्यामुळे पाणी नेहमी  असते असं समजलं. किल्ल्यात आणि परिसरात बिबट्याचा वावर आहे आणि तशी बिबट्या संबंधी पाटी सुद्धा चर्चकडे जाण्याच्या रस्त्यावर दिसते




किल्ल्या मध्ये जागोजागी करटूल्याचे वेल लागलेले आहेत. त्याच्या पिवळ्या फुलांनी किल्ला सजलेला दिसला 







एकंदरीत हा इतिहासाचा साक्षीदार हल्ली मदतीची हाक मारत जीर्ण होत चाललेल्या अवस्थेत उभा आहे








घोडबंदर किल्ला आणि पोर्तुगीज कालीन चर्च - गुगल नकाश्यावर