Search This Blog

Tuesday, May 19, 2015

गोंदेश्वर हेमाडपंथी मंदिर - Gondeshwar Temple


नाशिक जवळ सिन्नर ला एक अप्रतिम हेमाडपंथी मंदिर आहे हे एकून होतो आणि म्हणूनच ह्या मे महिन्यात थोडा वेळ काढून ह्या मंदिराकडे मोर्चा वळवला. नाशिक शिर्डी रस्त्यावर असलेल्या सिन्नर गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला हे मंदिर आहे. गावातून जायला रस्ता आहे म्हणून गाडी घेउन आत शिरलो पण रविवारी बाजाराचा दिवस असतो आणि हे माहित नसल्याने भरपूर वेळ इकडून तिकडून फिरलो आणि परत हायवे वर आलो कारण रस्त्यांनवर इतकी दुकानं मांडली होती की कार ने मंदिरापर्यंत पोचण शक्यच नव्हत. मग चौकशी आणि गुगल काकांच्या मार्गदर्शना प्रमाणे गावाला वळसा घालून मंदिरा जवळ पोचलो. मंदिरात ७-८ मुलं मंदिरातील शांततेच फायदा घेत अभ्यास करत बसली होती 


सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर हे एक शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिर परिसरात प्रवेश केला की अक्षरशः भारावून जायला होतं. मंदिरा भवती तटबंधी आहे. मंदिर परिसर ही अगदी स्वच्छ होता. मंदिरात शिरताना दगडी दारावरील नक्षीकामच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत. दारातून प्रवेश केला की दगडी खांब आणि समोर येणाऱ्या उजेडात गोंदेश्वर मंदिरच पाहिलं दर्शन घडतं. 


मंदिरा समोर मोठी मोकळी जागा ही आहे आणि डावीकडे दगडी बांधकाम आहे. बहुदा ह्या खोल्या पुजाऱ्यासाठी किंवा मंदिराला भेट द्यायला येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बनवल्या असाव्या. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना म्हणून ह्या मंदिराकडे बोट दाखवता येईल 



मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. उंच आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे आणि अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. प्रमुख मंदिरा भवती असलेली इतर मंदिरं सुद्धा अप्रतिम कोरीवकाम दर्शवतात. गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे. आणि गाभाऱ्यातच्या दारावर अतिशय बारीक आणि सुबक नक्षीकाम केलेलं आहे . 







मंदिराच्या बाहेर अनेक देवीदेवतांची शिल्प बघायला मिळतात. 
संपूर्ण मंदिराभावती हत्तींची शिल्प कोरलेली आहेत जसे की ह्या हत्तींनी हे मंदिर उभारून पाठीवर तोलालय. मंदिराच्या बाजूला एक मोठा पाण्याचा तलाव ही आहे.


 हे मंदिर नक्कीच खास जाऊन भेट देण्यासारखं आहे. रथसप्तमीला सूर्यपूजा थाटामाटात साजरी होते अशी माहिती मिळाली.  ह्या मंदिरा  जवळच असलेलं अर्येश्वर मंदिर आणि गारगोटी म्युझियम हे देखील नक्की बघा

नाशिकहून येतांना आडवा  फाट्यावर डावीकडे वळलं की लगेच आयेश्वर मंदिर लागतं ते लहानसं मंदिर बघून गोंदेश्वर कडे जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवलेला आहे. पण जर रविवारी जाणार असाल तर गावात बाजार भरतो तेव्हा हायवे वरून गावाला वळसा घालून गोंदेश्वर मंदिरात जाल तर उत्तम


Wednesday, May 13, 2015

लोनाड चे प्राचीन शिव मंदिर - Lonad Shiv Temple


लोनाड ची बौद्धकालीन लेणी बघून (खांडेश्वरी देवी मंदिर)  बघून पुढच्या मंदिरा केडे मोर्चा वळवला. लेण्यांची टेकडी उतरलो आणि मूळ रस्त्याला लागलो की समोर मोट्ठे पाईप दिसतात. थोडं डावीकडे वळलो की लगेच समोर लोनाड गावात जायचा रस्ता दिसतो. हे लहानसं गाव आहे त्यामुळे रस्तेसुद्धा छोटे छोटे आहेत. साधारण ५-७ मिनिटं बाईक ने गावात गेल्यावर एका प्राचीन दगडी मंदिरा जवळ पोचलो. हेच ते शिलाहार कालीन शिव मंदिर. 



हे मंदिर साधारण ११व्य शतकातलं असावं पण मंदिर मात्र पार मोडकळीस आलेलं आहे. मंदिराचा गाभारा आणि आतील शिवलिंग हेच काय ते जरा ठीक परीस्थित आहेत. व्हरांडा, सभामंडप, कळस हे सगळं पडलं आहे, त्याचे अवशेष मंदिरा बाजूला विखुरलेले दिसतात.  आम्ही गेलो तेव्हा मंदिराच्या दगडांवर कपडे वाळत घातले होते. एक आजोबा एका मोठ्याश्या आडव्या दगडावर आडवे झाले होते, ते आमच्या केडे "कुठून आली हि ब्याध" अश्या चेहऱ्याने बघून परत कुशी बदलून झोपले. काही लहान मुलं त्या पडीक मंदिराच्या ढासळत चालेल्या एका मोठ्या दगडाखाली आनंदात खेळत होती


आम्ही प्रथम शिवदर्शानासाठी गाभाऱ्यात शिरलो. गाभारा हा साधारण पाच सहा मोठ्या पायऱ्या उतरून मग खाली आहे. शंकराची पिंड आणि त्या समोर नंदी हे गाभाऱ्यातच आहेत. अभिषेकाची व्यवस्था केलेली आहे. त्यामानाने गाभारा स्वच्छ ही होता आणि रोजची पूजा ही होत असावी कारण विड्याच्या पानावर काही नेवेद्य वाहिलेला दिसला. नंदी चा चेहरा पार झिजून गेलेला आहे तर मूळ पिंडी शेजारी एक लहानशी काळी पिंड सुद्धा आहे पण ती मूळ गाभाऱ्या मधील नसावी. गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर ऑईल पेंट ने मोठ्ठा ओम काढला आहे. कश्यासाठी ते काही कळलं नाही. तसाच ओम आणि गाभाऱ्याच्या बाहेर ही काढलेला आहे 


गाभाऱ्याचे छतावर आतून साधीशी नक्षी आहे पण आता त्यातली फारच कमी नक्षी दिसते कारण दगडाची झीज झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी वाढत चालेल्या भेगा स्वच्छ दिसतात.




मंदिराची पडझड बघून वाईट ही वाटतं.  त्वरेने जर काही उपाय योजना केली गेली नाही तर हा इतिहासाचा अमूल्य ठेवा संपूर्ण भुईसपाट होईल.


मंदिराच्या डावीकडे सुद्धा एक शिवलिंग बघायला मिळतं पण ते तिथे नंतर ठेवल्यासारखं वाटतं



मंदिराच्या दगडाची वाढती झीज ह्यामुळे मंदिराभोवातीच्या शिल्पातीला कलाकुसर मनासारखी टिपता येत नाही. अर्थात ह्या मंदिरावरचे नक्षीकाम हे हि तसे साधेसे आहे.  मंदिराच्या मागे एका तलाव आहे. आणि बाजूच्या शेतात एक शिलालेख ही सापडला आहे पण ते आम्हाला नंतर कळलं आणि तो बघायचा राहिला. तो शिलालेख प्रदर्शांत हलवायची योजना होती पण गावकऱ्यांच्या श्रद्धेमुळे ती प्रत्यक्षात आणली गेलेली नाही. आजुबाजीला विखरलेले मंदिराचे अवशेष बघून आणि शंकराचरणी परत एकदा नतमस्तक होऊन आम्ही परतीची वाट धरली. नेहमी प्रमाणे मनात तोच प्रश्न की एवढी अवाढव्य आणि अप्रतिम मंदिरं हजारो वर्षा पूर्वी बनवलीच कशी असतील. त्या सर्व अज्ञात कलाकारानाही शतशः प्रणाम




लोनाड चे प्राचीन शिव मंदिर - गुगल नकाश्यावर 




Monday, May 11, 2015

अंबरेश्वर मंदिर :- ( Ambareshwar Mandir)





मुंबई उपनगरातील अंबरनाथ येथे असलेले अंबरेश्वर मंदिर हे एक प्राचीन आणि भारतीय शिल्प्कारीतेचा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर बघायचा योग आज आला आणि इतके वर्ष ह्या ठिकाणी का आलो नाही हा प्रश्न पडला इतकं अप्रतिम मंदिर आहे. मंदिर परिसर स्वच्छ आणि आवरलेला बघून खरच आनंद वाटला. मंदिराची देखरेख करण्याऱ्या समितीचे मनपासून आभार.

मंदिराचे बांधकाम साधारण शके ९८२ इतके पुरातन आहे. शिलाहार राजा चीत्तारजा ह्याने ह्या अप्रतिम मंदिराचे बांधकाम केले असून त्याचा मुलगा राजा महामंडलेश्वर माम्बानी ह्याने १०६० रोजी मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. हेमाडपंथी बांधकाम पद्धतीने मंदिराची बांधणी केलेली आहे. 





काळ्या दगडात बांधलेल्या ह्या मंदिरात अनेक देवी देवतांची शिल्पे बघायला मिळतात. लक्ष्मीची मूर्ती, शिवलिंग, शंकराची मूर्ती ,पार्वती, नरमुंडधारी महाकाली, शंकर पार्वती विवाह, हंसा वर आरूढ ब्रम्हदेव, वराहरुढ विष्णू ,ऊजव्या सोंडेचा गणपती, त्याच बरोबर विविध नृत्यांचे आविष्कार व काही  शृगांरिक कामशिल्पे कोरलेली दिसतात. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत आणि मंदिरा चा प्रमुख दरवाजा हा पश्चिमेला आहे. 



मंदिराच्या दरवाजात दोन नंदी आहेत त्यातला खाली असलेला नंदी हा मंदिरा इतका प्राचीन आहे तर चौथऱ्यावर स्थापित नंदी हा अलीकडचा आहे. तो कोणी नवस केल्यावर मंदिराला दान केला असं तिथे विचारणा केल्यावर कळलं. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पाण्याच्या वाटी सारखी दगडी वाटी दिसते तिथून शंकराची पिंड सरळ दिसायची असं समजलं पण सध्या ते दर्शन बंद करण्यात आलेलं आहे.





मंदिराचे कोरीव काम हे खरोखरीच अप्रतिम आहे अर्थात दगडाची जी झीज होते ती झालेली आहे.  हे मंदिर सुद्धा इंग्रजांच्या काळात कोणा एका इंग्रजाला सापडलं आणि परत ते वावरत आलं असं समजलं. मंदिराचा गाभारा हा जमिनीपेक्षा खाली असल्याने छोट्याश्या दरवाजातून १०-१२ पाहिऱ्या उतरून मग शिवलिंगापर्यंत पोचता येते.  दोन नंदी प्रमाणे मंदिरात शिवलिंग सुद्धा दोन आहेत. त्यातले एक शिवलिंग काळ्या रंगाचे आहे जे स्वयंभू आहे तर दुसरे शिवलिंग गारगोटीचे आहे. गाभाऱ्यात बरून सूर्यप्रकाश व हवा यायला झरोका आहे. आणि गाभाऱ्यात काही चिमण्यांनी आपली घरटी सुद्धा मांडली आहेत. मंदिरात असलेले चार खांब आणि छतावरील कोरलेली झुंबर खरोखर आपलं लक्ष लगेच वेधून घेतात . 



मंदिरा शेजारी बांधलेला तलाव आहे आणि त्यात उन्हाळात ही पाणी बघायला मिळतं. ह्या छोट्या तलावात मासे कासवं सोडलीली आहेत. हा तलाव देखील दगडात कोरून काढला असून पायऱ्या तसेच चारी कोपऱ्यात शिल्प कोरलेली आहेत.

मलंग गडाच्या पायथ्याशी उगम पावणारी वालधुनी नदी मंदिराला लागुनच वाहते. पण उन्हाळ्यात मात्र नदीचे पात्र फारच रोडावते आणि त्यात नदीत सोडलेल्या गटारीमुळे असेल अदाचीत पण नदीचे पाणी अतिशय खराब दिसते. नदीच्या मध्ये सुद्धा एक शिवलिंग आणि त्याच्या भोवती एक भगवा झेंडा रोवलेला दिसतो.  अंबरेश्वर मंदिरामुळेच ह्या गावाला अंबरनाथ असं नाव पडलं असावं असं वाटत.

इथे पोचण्यासाठी अंबरनाथ पर्यंत लोकलने जाऊन , अंबरनाथ पूर्व बाजूला शेअर रिक्षा उपलब्ध आहेत, साधारण १० रुपये प्रती प्रवासी दराने ह्या रिक्षा आपल्याला मंदिरापर्यंत नेतात. मंदिर साधारण २ कि मी लांब आहे त्यामुळे वेळ असल्यास चालत २५ मिनिटात मंदिरापर्यंत पोचता येते

अम्बरेश्वर मंदिर गुगल नकाश्यावर : -



लोनाड ची लेणी (Lonad Caves) - खंडेश्वरी देवी

लोनाड ची लेणी (Lonad Caves) 

ही बौद्ध लेणी कल्याणच्या जवळ आहेत. सध्या ह्या लेण्यांच खंडेश्वरी देवी मंदिरात रुपांतर झालेलं आहे. अगदी लहानशी ही लेणी पण अगदी स्वच्छ परिसर आणि बहुदा रोज होणारी पुजाअर्चा त्यामुळे परिसर अगदी प्रसन्न वाटतो. साधारण ५ व्या शतकातली ही लेणी असावी असं इतिहास सांगतो




साधी लेणी आणि शांत वातावरण हे लेण्यांना भेट दिली की लगेचच जाणवतो. संपूर्ण प्रवास उन्हात केल्यावर मंदिराच्या गुहेत नैसर्गिक एयर कंडीशनर मध्ये गेल्यावर फारच सुंदर आणि मस्त वाटलं. बाहेर व-हंडा मग आत प्रर्थानेचा हॉल  आणि मग आत गाभारा अशी मांडणी आहे. व-हंडा ला चार खांब होते पण त्यातला एक खांब भग्न झाला आहे आणि त्याचे काही अवशेष आवरून ठेवलेले दिसतात. 


डावीकडे एक पाण्याचं टाकं आहे आणि अगदी मे महिन्याच्या रणरणत्या उन्हातही तिथे पाणी दिसतं. पाणी वापरात नसल्याने मासे बेडूक ही आहेत आत पण पाणी दिसायालात तरी शुद्ध दिसतं. 




पाण्याच्या टाकी समोर म्हणजे मंदिराच्या उजवीकडे. दगडात कोरलेली शिल्प आहेत त्यांना मारुतीला फसतात तसा शेंदूर फसलेला आहे. आत ही बऱ्याच मूर्त्या आणि शिल्प अशीच शेंदुराने सजवलेली दिसतात. हे शिल्प तसं बघायला गेलं तर उत्तम परिस्थितीत आहे. ह्या शिल्पा बद्दल माहिती उपलब्ध झाली पण दोन वेगळ्या माहित्या पदरात पडल्या म्हणजे 

एक अशी की दुसरा खुश्रु याने पुलकेशीच्या दरबाराला दिलेल्या भेटीचे हे दृश्य आहे तर दुसरी माहिती अशी की हा प्रसंग बौद्ध आपल्या वडिलांच्या राज्यात ज्ञानप्राप्ती नंतर येवून पूर्वजन्माची माहिती देतांना चा प्रसंग आहे. शिल्पामध्ये राजा, दरबार, सेवक, कलाकार दिसतात.


प्रर्थाना सभागृहात विशेष असं काही नाही. मूळ गाभाऱ्याच्या बाजूला दोन कोनाडे कोरले आहेत त्यात एका कोनाड्यात गणपती आणि मूषकाची मूर्ती आहे तर दुसरा कोनाडा रिकामा आहे. गाभाऱ्याच्या समोरील यज्ञकुंड आणि लेण्याच्या बाहेरील तुळशी वृंदावन हे नवीन बनवलेले दिसतात.


गाभाऱ्यात ही एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे आणि एका खड्यात पाणी झिरापातांना दिसतं. 


मंदिराच्या गाभाऱ्यात खंडेश्वरी देवी आणि हनुमान अश्या मूर्त्या आहेत. 



मंदिराच्या गाभाऱ्यात आम्हाला एक रंगीबेरंगी बेडूक ही दिसला. Hylarana nigrovittata जातीचा हा बेडूक होता. लेण्याबाहेर वेडा रघु, दयाळ वगैरे पक्षी ही दिसले.

देवीमातेचं दर्शन घेवून लोणार गावात असलेल्या प्राचीन शिवमंदिर बघायला आम्ही निघालो  

लोणार लेण्यांना कल्याण पासून जाण्याचा रस्ता खालील नकाश्यात दर्शिवलेला आहे