Search This Blog

Tuesday, July 21, 2015

हुमायूनचा मकबरा - Humayun Tomb - UNESCO Site





हुमायून हा बाबर नंतर चा दुसरा मोगल सम्राट होता ज्याचं मूळ हे अफगाणिस्थान मधलं, १५३१ साली वडिलांकडून मिळालेलं राज्य हुमायून टिकवू शकला नाही. त्याच्या सावत्र भावांनी त्याच्या राज्याचे लचके तोडले आणि पुढे शेर शहा सुरी ने होमायुनचा संपूर्ण पराभव केला आणि त्याला राज्य सोडून मदतीसाठी पळावं लागलं, पुढे १५ वर्षांनी इराणच्या राज्याच्या मदतीने त्याने भारतात गमावलेलं राज्य परत मिळवलं. १९५६ साली त्याच्या मृत्यू नंतर दिल्लीच्या पुराना किल्यात हुमायून राजाला दफन केलं गेलं पण हेमू राजाने दिल्लीवर स्वारी करून किल्ला हस्तगत केला त्यापूर्वी हुमायून राजाच्या पार्थिवाला कबरीतून बाहेर काढून पंजाबला कलानौर ला परत दफन केलं गेलं पुढे हुमायून राजाचा मुलगा अकबर ने राज्य सांभाळल्यावर हुमायून राजाची पहिली पत्नी बेग बेगम ने आपल्या पतीच्या स्मरणार्थ विशाल स्मारक बनवलं तोच हा हुमायून मकबरा. मिरक मिर्झा घियास ह्या स्थापत्य विशारदाच्या अधिपात्यात हा मकबरा बांधला गेला आहे. मग हुमायून राजाच्या पार्थिवाला पंजाब मधून पुन्हा काढून इथे दफन केलं गेलं 


हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन पासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर मथुरा रोड वर हा हुमायूनचा मकबरा आहे. लाल वाळूच्या खडकापासून बांधलेली इतकी मोठी अशी ही पहिलीच वस्तू. हुमायून ची ही कबर भारतीय उपखंडात बांधली गेलेली पहिली भव्य कबर म्हणावी लागेल. ह्या इमारतीत अनेक राजघराण्यातील लोकांच्या कबरी आहेत ज्यामाध्ये बेग बेगम (जीने हे स्मारक उभारलं), हमीद बेगम तसाच हुमायून चा पणतू दारा शिकोह ह्याचं सुद्धा दफन करण्यात आलं. दारा शिकोह हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ ज्याला शहाजहान ने आपला वारसदार जाहीर केलं होतं पण औरंगजेबाने राज्यप्राप्तीसाठी आपला भाऊ दारा शिकोह ला मारून टाकलं अशी नोंद इतिहासात आहे. मोगलांचा शेवटचा राजा बहाद्दूर शहा जाफर ह्यला इंग्रजांनी इथूनच धरून रंगूनला हद्दपार केलं होतं. ह्या इमारतीचं बांधकाम हुमायून च्या मृत्युनंतर ९ वर्षांनी (सन १५६५) सुरु झालं ते १९७२ पर्यत सुरु होतं. जी आज युनेस्को च्या जागतिक वारसा च्या यादीत सामाविष्ट केलेली आहे. भारतात युनेस्को च्या जागतिक वारस यादीतील साधारण ३२ ठिकाण आहेत त्यातलीच ही एक वस्तू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी २०१० मध्ये या माकाबऱ्याला भेट दिली होती.

हुमायून चा मकबरा ३० एकर पसरलेल्या चार बाग बगिच्या मध्ये एका प्रचंड अश्या चौथऱ्यावर उभारला आहे ह्या चौथऱ्याची उंची ७ मिटर एवढी आहे आणि वर जाण्याचा दगडी जिना एकदम चढा आहे. गुढगा दुखावणारा हा जिना चढून गेलं की समोर मकबरा दिसतो, सध्या पश्चिमेकडचा मार्ग खुला ठेवल्या ने मकाब-या मध्ये जायला फिरून जावं लागतं

पण त्यापूर्वी डावीकडे चौथऱ्यावरच अनेक संगमरवरी कबरी उघड्या म्हणजे आकाश्या खाली दिसतात. मकबरा हा दोन माजली असून तो पिवळ्या काळ्या संगमरवरापासून बनवलेला आहे. त्यावरील डोम पर्शियन पद्धतीचा असून मकबरा ४७ मिटर उंच आहे . अतिशय प्रशस्थ अशी ही वस्तू असून नक्षीकाम अप्रतिम आहे.


संगमरवरात कोरलेल्या जाळ्या तर थक्क करून टाकणाऱ्या आहेत. अष्टकोनी मधल्या खोलीत हुमायूनची संगमरवरी कबर आहे तर आजूबाजूच्या खोल्यांमध्ये राजघराण्यातील इतरांच्या कबर घडवलेल्या दिसतात. अर्थात खऱ्या कबरी ह्या तळ घरात असून तिथे जायला बंदी आहे. सुदैवाने काही साफसफाई च्या कामानिमित्त उघडलेल्या बेसमेंटला बघता आलं. मूळ कबरी ह्या साध्याश्या आहेत आणि वर स्थापलेल्या दर्शनाच्या कबरी मात्र उत्तम नक्षीकामासह आहेत. ह्या मकबरा परिसरात साधारण १०० कबरी आहेत पण सगळ्यांवर नाव न कोरल्याने बऱ्याच कबरी नक्की कोणाच्या हे समजत नाही 

निजामुद्दीन स्टेशन पासून अगदी जवळ आहे तिथून रीक्ष्या बसेस उपलव्ध आहेत. तिकीट : १० रुपये आणि फोटो कॅमेरासाठी वेगळं तिकीट नाही. आत गेल्यावर डाव्याबाजूला लहानसं उपहारगृह ही आहे. कमीत कमी साधारण २ तासाचा वेळ हुमायून मकबरा आणि आजूबाजूची स्मारकं बघायला लागतो. ह्यामध्ये बु हलीमा चा मकबरा, इसा खान चा मकबरा, अफसरावाला मकबरा, नीला घुमबाद वगैरे आहेत. दिल्लीदर्शन सहलीत हुमायून मकबरा हे एक महत्वाचं ठिकाण म्हणून पर्यटकांना दाखवण्यात येतं




हुमायूनचा मकबरा तसेच आजूबाजूची ठिकाणे गुगल नकाश्यावर 

Thursday, July 2, 2015

घोडबंदरचा किल्ला - Ghodbandar Killa

घोडबंदरचा किल्ला :

ठाणे शहरापासून जवळच उल्हास नदीच्या काठावर घोडबंदर किल्ला शेकडो वर्षाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. ऐतिहासिक वस्तू ह्या जतन करण्यापेक्षा त्या दुर्लक्ष करण्याकडे आपला सगळ्यांचा कल असतो हे घोडबंदर किल्ला बघितला की प्रकार्ष्याने जाणवते. पोर्तुगीज, मराठे आणि इंग्रज असा खांदेपालट बघता बघता हा किल्ला एकेकाळी इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय ही होता. पण आता किल्याची अवस्था फारच दैनीय आहे . मागे काही वर्षापूर्वी ह्या किल्याची डागडुजी करून हा किल्ला एक पर्यटक आकर्षण बनवायचे प्रयत्न केले गेले असं ही ऐकलं पण ते पूर्ण फेल गेलेलं दिसून येत


पोर्तुगीज ठाण्यात आल्या नंतर त्यांनी ह्या किल्ल्याची बांधणी सुरु केली ती साधारण १५५० साली, अरबी घोड्यचा व्यापार ह्या बंदरातून व्हायचा म्हणून हे घोडबंदर आणि ते सुरक्षित राहावे म्हणून हा घोडबंदर किल्ला 
नंतर ह्या किल्ल्यात काहीना काही भर पडत राहीली ती १७३० पर्यंत. ह्या किल्ल्याचे नाव Cacabe de Tanna असं  ठेवलं होता त्यांनी. 


ह्या किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांनी एक चर्च बांधलं होतं ती वस्तू आज ही उभी आहे. जिथे कालांतराने एक हॉटेल मग कार्यालय आणि आता ओसाड खोल्या आहेत. आतील भिंत आणि जमिनी पूर्णपणे नवीन वाटतात, म्हणजे त्या आहेतच फक्त मूळ बांधकाम आणि दरवाजा पोर्तुगीज बांधणी दर्शवतो. 

ह्या चर्च च्या बाहेर एक मस्त वडाचं झाड आहे आणि त्या झाडावर ८-१० माकड भरदुपारी अगदी शांत झोपली होती. आमचं लक्ष सहज वर गेलं तर ही सतत धिंगाणा घालणारी माकड शांत झोपलेली दिसली. मी खरतर झाडावर झोपलेली माकड पहिल्यांदाच बघत होतो.

हा किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांकडून ही बरेच प्रयत्न झाले होते. १६७२ साली शिवाजी महाराजाच्या सैन्याला ही अपयश पचवावं लागलं होतं. पोर्तुगीजांचे सशक्त आरमार आणि आधुनिक शस्त्रास्त्रे ह्या जोरावर दिव दमण, वसई ते गोवा पर्यंत मुलुख मारला होता आणि जनतेवर जबरदस्ती धर्मांतर लादले जाऊ लागले. ती तक्रार छत्रपतीकडे गेली आणि मग पोर्तुगीजांना धडा शिकवायची कामगिरी थोरल्या बाजीरावांनी उचलली आणि त्यांचे धाकले बंधू चिमाजी अप्पा ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना पोर्तुगीजांवर चालून गेली. घोडबंदर किल्ला हा १७३७ साली मराठ्यांच्या ताब्यात आला. हा किल्ला आणि साष्टी बेट हे दोन्ही १०-१५ दिवसाच्या युद्धानंतर मराठांच्या हाती लागलं आणि पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून इथली जनता मुक्त झाली. पुढे १८१८ ला हा किल्ला इंग्रजांनी जिंकला आणि तेथे इस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा कार्यालय वसवले.


किल्यामध्ये हल्ली काही दगडी कमानीचे अवशेष बाकी आहेत त्याच्या पुढे मोकळी जागा आहे. कमानी जवळ एक बुरुज आहे जिथे जायला लहानश्या दरवाजातून दगडी पाहिऱ्या आहेत. ह्या बुरुजावरून खाडी आणि बाजूचा हिरवागार निसर्ग अप्रतिम दिसतो. किल्ल्याच्या एका बाजूला गोडाऊन सारख्या चौकोनी खोल्या आहेत. पण त्याच्यावरचं छप्पर मात्र उडून गेलेल आहे 


किल्ल्याच्या मध्ये पाण्याचं मोठे टाकं आहे आणि त्याला पाण्याचा जिवंत प्रवाह आजही ही आहे त्यामुळे पाणी नेहमी  असते असं समजलं. किल्ल्यात आणि परिसरात बिबट्याचा वावर आहे आणि तशी बिबट्या संबंधी पाटी सुद्धा चर्चकडे जाण्याच्या रस्त्यावर दिसते




किल्ल्या मध्ये जागोजागी करटूल्याचे वेल लागलेले आहेत. त्याच्या पिवळ्या फुलांनी किल्ला सजलेला दिसला 







एकंदरीत हा इतिहासाचा साक्षीदार हल्ली मदतीची हाक मारत जीर्ण होत चाललेल्या अवस्थेत उभा आहे








घोडबंदर किल्ला आणि पोर्तुगीज कालीन चर्च - गुगल नकाश्यावर







Wednesday, June 24, 2015

आयेश्वर मंदिर - Ayeshwar Temple

सिन्नर ला गोंदेश्वर मंदिर हल्ली बऱ्याच लोकांना माहिती आहे पण नाशिक शिर्डी  मार्गावर सरस्वती नदीच्या किनारी आयेश्वराच एक प्राचीन मंदिर आहे ते फारसं कोणाला माहिती नाही आणि त्या मंदिराबद्दल फारशी माहिती सुद्धा उपलब्ध नाही. बरीच शोधाशोध केल्यावर आणि काही जुनी पुस्तक चाळल्यावर काही माहिती मिळाली ती इथे देतो आहे


नाशिक शिर्डी मार्गावर सिन्नर जवळ आडवा फाटा लागतो नाशिकहून येतांना तिथून डावीकडे वळलं की लगेचच आपण आयेश्वर मंदिराजवळ पोचतो. तिथे पहिल्यांदा एका लहानसा बगीचा लागतो आणि त्याला लागून जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रोडवर वळलो की लगेच आयेश्वर मंदिर दिसतं. ह्या मंदिराला एश्वरेश्वर मंदिर (Aishwaryeshvar Temple)  असं ही म्हणतात

हे महाराष्ट्रात बांधलेलं द्राविडी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेलं एक सुंदर मंदिर आहे पण दुर्वैवाने मंदिराची पडझड दुरुस्ती पलीकडे गेलेली आहे. मंदिर सुदैवाने राष्ट्रीय सुरक्षित स्मारक च्या यादीत मोडतं त्यामुळे मंदिरा भवतीचा परिसर अतिक्रमाणा पासून सुरक्षित आणि मोकळा आहे आणि मंदिर परिसराला रीतसर कंपाउंड ही घातलेलं आहे पण मंदिराबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही. असं म्हणतात की चालुक्य (कल्याणी) ज्याला द्राविडी शैली असं ही म्हणतात त्या शैलीतील सर्वात उत्तरेकडील मंदिर हे आयेश्वर मंदिर आहे. कालादृष्ट्या देखील जाणकारांच्या मते हे हेमाडपंती गोंदेश्वर मंदिरापेक्षा ही वरच्या क्रमावार आहे. हे मंदिर सुद्धा साधारण १०-११ व्या शतकातील आहे. पण मंदिर निर्मात्याची माहिती इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवून गेलेली आहे.

चाणक्य शैलीतील मंदिर महाराष्ट्रात ते ही यादव राज्यात कसे ह्याचा एक कयास असा मांडला जातो की त्याकाळी व्यापारी लोक विविध प्रदेशात व्यापार निमित्त फिरत, देश बघत आणि एखाद मंदिर किंवा त्याची कलाकुसर जरा मनात भरली तर हे श्रीमंत व्यापारी त्या कलाकारांना आपल्या भागात घेऊन येत आणि राजाच्या परवानगीने एखादा नवस किंवा आपल्या कडून धर्मिक कार्य घडावे म्हणून मंदिर निर्माण करत. कदाचित राजदरबारातील एखादा मंत्री सुद्धा अश्या प्रकारे मंदिर निर्मिती करत असे.


आयेश्वर मंदिराचे ठळक असे दोनच भाग आहेत गाभारा आणि मंडप.  मंदिराचा चौथरा विस्तीर्ण आहे आणि त्यावर आणखी एक मंडप बांधण्याचा विचार ही असावा असं दिसतं पण ते काम पूर्ण झालं नाही. तिथे उभारलेले स्तंभ फक्त दिसतात. 












गाभारा साध असून कोपऱ्यात अर्धे खांब आहेत. गाभाऱ्यात शंकराची पिंड आणि मंडपात नंदी विराजमान आहेत. नंदीच्या गळ्यात माळ आणि पाठीवर झूल आहे पण दगडाची झालेल्या झिजेमुळे कलाकुसर फारशी दिसून येत नाही. मंदिराचं शिखर मात्र आज जागेवर नाही , केवळ शिखराचा एक स्तर दिसतो. द्राविडी शैली प्रमाणे ते अनेक थरांचे शिखर असावे.

मंदिराच्या मंडपाचे खांब मात्र उत्कृष्ठ कलाकुसरीचा नमुना आहेत. कोरीव नक्षी कामा बरोबरच उत्तम मूर्तिकाम सुद्धा ह्या खांबांमध्ये दिसून येते. हे खांब सरळ आहेत, इतर मंदिराप्रमाणे वर चौकटी जवळ निमुळते झालेले नाहीत. ह्या खांबांवरची कलाकुसर बघून थक्क व्हायला होतं. 

त्यानंतर गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस सुद्धा सुंदर नक्षीकाम तर उरलेल्या कळसाच्या एका थरावर काही मूर्त्याही दिसतात.



पण ह्या मंदिरच खर वैशिष्ठ आहे तर गाभाऱ्याच्या दरवाज्यावर कोरलेले मकर तोरण. ह्या अर्धवर्तुळाकार तोरणाची सुरवात दरवाज्याचा खांबांपासून होते. दोन्ही खांबावर दोन मकर असून दरवाज्यावर गंधर्व कीचक ह्यांचे तोरण आहे आणि मध्यावर कीर्तिमुख आहे. मकराच्या शेपटीची नक्षी बनवण्यात आलेली आहे. नैसर्गिक झीज सोडली तर हे तोरण फारच अप्रतिम दिसत असणार




मंदिराच्या आजूबाजूस काही ढसाळलेली दगड ही दिसतात. गोंदेश्वर आणि आयेश्वर दोन्ही मंदिरामध्ये मुलं अभ्यास करतांना दिसली आणि खरोखरच ह्या दोन्ही मंदिरा मधलं वातावरण सुद्धा खूपच शांत असतं. हे अप्रतिम मंदिर बघून मग आम्ही गोंदेश्वर मंदिर बघायला निघालो

आयेश्वर मंदिर - गुगल नकाश्यावर 


Reference: ह घी सांकलिया ह्यांचे पुस्तक “महाराष्ट्रातील पुरातत्व”






Saturday, June 13, 2015

पाताळेश्वर गुफा मंदिर - Pataleshwar Caves


लेणी बघायची म्हंटलं की कुठेतरी डोंगरावर घाम गाळात जायचं आणि मग तिथलं ते शेकडो वर्ष जुनं कोरीवकाम बघून तृप्त व्हायचं हे नेहमी लेणी बघतांना येणारा अनुभव आहे पण अगदी भर शहरी वस्तीत ही लेणी असू शकतात आणि असं एक लेण पुण्यात अगदी भरवस्तीत आहे. जंगली महाराज रोड वर , जंगली महाराज समाधीच्या शेजारी पाताळेश्वर हे हिंदू गुफा मंदिर आहे आणि ह्या लेण्यात शंकराच पुरातन मंदिर आहे. साधारण ८ व्या शतकात राष्टकुट काळात खोदलेल हे मंदिर आता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतं. अर्थात ते पूर्वी शहराच्या बाहेर होतं पण शहराच्या वाढत्या वेशीने ह्या मंदिराला अगदी भरवस्तीत आणून ठेवलाय. सुदैवाने हा परिसर हिरवागार आहे. 

ह्या मंदिराचं आणखी एक वेगळेपण म्हणजे हे मंदिर जमीन खोदत खाली बनवलेलं आहे. कदाचित म्हणूनच ह्याला पाताळेश्वर नाव पडलं असावं. ज्वालामुखी ने तयार झालेल्या टणक खडकात वरपासून खाली खोदत जात नंदी मंडप आणि मग आडवं खोदत हे गुफा मंदिर बनवलेलं आहे जस वेरुळचे कैलास लेण ही अश्याच पद्धतीने बनवलं आहे.



जंगली महाराज समाधीला नमस्कार करून डावीकडे पाताळेश्वर मंदिर आहे. काही दगडी पायऱ्या उतरून मंदिरात जावं लागतं पण ह्या पायऱ्या उतरण्या आधीच आपलं लक्ष वेधून घेतो तो मंदिरा समोरील भव्य गोलाकार दगडी नदीमंडप. हा भव्य मंडप १६ खांबांवर उभा आहे. 



मंडपात नदीची कोरीव दगडी मूर्ती, ह्या नदीच्या गळ्यात माळा, घंटा वगैरे कोरलेल्या आहे. एकंदरीतच नंदीमंडप म्हणजे खास नदीसाठी मंडप मी पहिल्यांदा बघितला. हा मंडप अतिशय दणकट आहे पण ह्यात फारस सुबक कोरीव वगैरे नाही. तरी ही हा नदीमंडप कायम लक्षात राहावा असाच आहे हे नक्की जाणकारांच्या मते ही अपूर्ण लेणी आहेत त्याच्या मागचं बरोबर कारण ज्ञात नाही पण कदाचित परकीय आक्रमणाचा धोका असावा किंवा आणखी काही 











डावीकडे मागच्या बाजूस एक आणखी नंदी ची मूर्ती ठेवलेली आहे पण तिचा तसा काही संदर्भ लागलं नाही. ह्या नंदीच्या रेषेत मंदिराच्या दिशेने गेलो की बाजूला एक ओसरी आहे. दोन खांबावर उभी ही लहानशी ओसरी आणि त्याच्या समोर एक लहानसं पाण्याचं टाक. एक वडाच झाड ओसरीपुढे आहे जिथे वटपोर्णिमेला गर्दी होते 





मंदिरात प्रेवेश केला की त्याची भव्यता लक्ष्यात येते.  एकूण चोवीस खांबांवर उभ्या ह्या मंदिरात पाताळेश्वरची प्रतिष्ठापना केलेली आहे. मूळ गाभाऱ्या बाजूला दोन आणखी खोल्या आहेत. बाजूला राम लक्ष्मण सीता ह्यांची सुंदर मूर्ती ही आहे. अर्थात ती संगमरवरी मूर्ती ही पुरातन नाही पण सुबक नक्कीच आहे. मंदिराच्या मागच्या उजव्या भागात उंचवटा आणि काही पायऱ्या आहेत. बहुदा ध्यानधरणे साठी एकांत लाभावा म्हणून ही सोय असावी. मंदिराच्या भिंतींवर मोठी शिल्प कोराल्याच्या खुणा आहेत पण ती शिल्प आता ओळखण्या पलीकडे गेलेली आहेत. ही लेणी ब्राम्हणी पद्धतीची मानली जातात त्यामुळे बौद्ध लेण्याप्रमाणे विहार दिसत नाही. हे प्रार्थना मंदिर आहे.

मंदिराच्या प्रेवेश्याच्या उजव्या खांबावर देवनागरी भाषेतील शिलालेख आहे पण तो ही कालानुमानाने झालेल्या दगडाच्या झिजे मुळे वाचता येत नाही, फक्त काही अक्षर समजतात. मंदिराच्या बाहेर, नदी मंडपाच्या उजवीकडे दगडी पायऱ्यांची विहीर देखेल आहे पण सध्या ती विहीर वरती जाळी टाकून बंद केलेली आहे

ह्या मंदिराचा पुसटसा उल्लेख काही पेशवे दप्तरात आढळतो आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी ह्या मंदिराचा जिर्णोधार ही केल्याचं समजत. इंटरनेट वर अधिक माहिती शोधली तर ह्या लेण्यांना काही मान्यवर परदेशी इतिहास तज्ञ आणि मोठ्या चित्रकारांनी खास भेट दिली आहे हे ही समजतं


मंदिरा च्या आजूबाजूला सुंदर बगीचा बनवलेला आहे आणि मंदिरातील स्वच्छता बघून खरच प्रसन्न वाटत. ह्या बगिच्या मध्ये एक पुरातन पिंपळाचा वृक्ष आहे त्याच्या पारंब्यांनी आपले पाय जमिनीत रोवून मूळ खोड कित्येक पटीने मोठं केलं आहे

ही लेणी सकाळी ८:०० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत दर्शनासाठी उघडी असतात. हे राबत मंदिर आहे जिथे आजही पाताळेश्वराची पूजाअर्चा नियमितपणे होते आणि सणासुदीला भाविकांची दर्शनासाठी रांग लागते. संभाजी नगर रेल्वे स्टेशन पासून अगदी चालत जायच्या अंतरावर हे गुफा मंदिर आहे



Friday, June 12, 2015

भाजाची लेणी - Bhaja Caves


भाजाची लेणी ही पुरातन व्यापारी मार्गावर वसवलेली सुंदर लेणी आहे. पूर्वी अरबी सागरातून आलेला माल / समान दक्खन पठारावर आणण्याच्या मार्गावर वसवलेली भाजा प्रमाणेच बडसे, कार्ला ही लेणी सुद्धा जवळच आहेत. बडसे लेणं तर भाजा लेण्याच्या डोंगर रांगेतच आहे आणि कार्ला हे साधारण ५ किलोमीटर उत्तरेकडे आहे. ह्या लेण्यांसोबत लोहगड आणि विशालगड हे दोन किल्ले ही ह्याच भागात आहेत ह्यावरून पूर्वी हा मार्ग हा एक प्रमुख व्यापारी मार्ग होता हे सहज समजून येतं. जेथे व्यापारी मार्ग होते, तिथे तिथे लेणी, विहार खोदले जायचे. .घाटमाथा व कोकण ही सह्याद्री ची दोन रूपं, आणि त्यांना जोडणारे जे काही घाटमार्ग आहेत उदा. कसारा, मालशेज, बोरघाट किंवा खंडाळा घाट, ताम्हाणी, वरंध, आंबेनळी, आंबाघाट, फोंडाघाट ह्या घाट चढताना वाटेत इतरत्र आपणास लेणी खोदलेली आढळतील. भाजाची लेणी भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिकार क्षेत्रात येतात


ही लेणी इसवीसन पूर्व २ शतकातील आहेत पुढे ही साधारण ८ शतकं ह्या लेण्यां मध्ये भर पडत राहीली आणि लेणी विस्तारत गेली. इतकी पुरातन लेणी आणि त्याकाळी केलेले ते कोरीवकाम बघून मती गुंग होवून जाते. ही लेणी हीनयान पद्धतीची असून त्यात एकूण २२ लेणी कोरली आहेत, त्यातील एक चैत्यगृह असून बाकी एकवीस विहार आहेत. 

भारतातील हे सर्वात जुने चैत्यगृह आज २२०० पेक्षाही अधिक जुनं असूनही खूपच चांगल्या परिस्थितीत बघायला मिळतं. चैत्यगृह हे प्रमुख लेण म्हणता येईल हे सत्तावीस अष्टकोनी खांबांवर तोललेलं आहे आणि ह्या खांबांवर कमळ, चक्र ही चिन्हे कोरलेली दिसतात. साधारण आठ उपलब्ध शिलेलेखापैकी एका पाण्याच्या टाक्यात असलेल्या लेखात दान करणाऱ्याच नाव “महारथी कोशिकीपुत विह्नुदत” असं सापडतं. ह्या चैत्यागृहात प्रमुख स्तूप आहे. जसा इतर लेण्यांच्या चैत्यागृहात आढळतो. चैत्यागृहाला लाकडी तुळयांचे छत बनवलेलं आहे आणि ही लाकडं सुद्धा २२०० वर्ष जुनी असून ही अजून शाबूत आहेत. हे खरोकर आश्चर्य म्हणावं लागेल ह्या लाकडात ही ब्राम्ही लिपीमध्ये काही लेख आहेत. आज चैत्यगृह हे उघड आहे पण पूर्वी दगडातील भोकं दर्शवतात की चैत्यागृहाला लाकडी दरवाजा असावा. 


ह्या लेण्यांमध्ये १४ स्तुपाचा एक समूह ही बघायला मिळतो. ह्यातील ५ स्तूप लेण्याच्या आत तर ९ स्तूप बाहेर अशी रचना आहे. ह्या स्तूपात तिथे राहणाऱ्या भिक्षुं चे अवशेष आहेत. स्तुपावर अम्पानिका, धम्मागिरी आणि संघदिना अशी भिक्षूंची नावं सुद्धा दिसतात. दोन स्तुपावर अवशेष ठेवण्यासाठी कोरीव दगडी खोके ही दिसतात 


सूर्य लेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेण्यामध्ये सूर्यदेव रथावर स्वर होऊन दानवांना तुडवत जातांनाचा देखावा आहे तर एका ठिकाणी इंद्र देवा हत्तीवर आरूढ झालेले दिसतात

खोलीच्या दरवाज्यावर अप्रतिम शस्त्रधारी द्वारपाल दिसतात. व्हरांडा मग एक दालन आणि त्याला आत आणि काही खोल्या अशी ह्या विहाराची मांडणी आहे पण ह्यातील नक्षीकाम फारच सुंदर आहे. एका शिल्पामध्ये नृत्य वाद्य कार्यक्रमाचं दृशा आहे आणि त्यात तबला हे वाद्य दिसतं आहे. तबला वाद्य इतके जुने असल्याचा हा एका ठळक पुरावाच आहे 


असे हे भारतातील प्रथम बौद्ध चैत्यगृह, २२०० वर्ष जुन्या लाकडाच्या तुळया आणि अप्रतिम कोरीवकाम, तबला वाद्याचा अधिकृत पुरातन पुरावा आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि भारतीय पुरातन खाते ह्याची देखभाल करत आहे. अगदी मामुली ५ रुपये प्रवेश शुल्क आहे. 


पावसाळ्यात ह्या लेण्यांचा खाली एक मस्त धबधबा कोसळतो आणि मग पावसाळी सहली ला जाणाऱ्यांची तोबा गर्दी होते. गाडी पार्किंग साठी ग्रामपंचायत २० रुपये चार्ज घेते. नक्की खास जाऊन बघावं असं हे लेण. मालवली रेल्वे स्टेशना पासूनचा मार्ग गुगल नकाश्यात दाखवला आहे 



Tuesday, May 19, 2015

गोंदेश्वर हेमाडपंथी मंदिर - Gondeshwar Temple


नाशिक जवळ सिन्नर ला एक अप्रतिम हेमाडपंथी मंदिर आहे हे एकून होतो आणि म्हणूनच ह्या मे महिन्यात थोडा वेळ काढून ह्या मंदिराकडे मोर्चा वळवला. नाशिक शिर्डी रस्त्यावर असलेल्या सिन्नर गावाच्या थोडं बाहेरच्या बाजूला हे मंदिर आहे. गावातून जायला रस्ता आहे म्हणून गाडी घेउन आत शिरलो पण रविवारी बाजाराचा दिवस असतो आणि हे माहित नसल्याने भरपूर वेळ इकडून तिकडून फिरलो आणि परत हायवे वर आलो कारण रस्त्यांनवर इतकी दुकानं मांडली होती की कार ने मंदिरापर्यंत पोचण शक्यच नव्हत. मग चौकशी आणि गुगल काकांच्या मार्गदर्शना प्रमाणे गावाला वळसा घालून मंदिरा जवळ पोचलो. मंदिरात ७-८ मुलं मंदिरातील शांततेच फायदा घेत अभ्यास करत बसली होती 


सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर हे एक शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिर परिसरात प्रवेश केला की अक्षरशः भारावून जायला होतं. मंदिरा भवती तटबंधी आहे. मंदिर परिसर ही अगदी स्वच्छ होता. मंदिरात शिरताना दगडी दारावरील नक्षीकामच पहिल्यांदा लक्ष वेधून घेत. दारातून प्रवेश केला की दगडी खांब आणि समोर येणाऱ्या उजेडात गोंदेश्वर मंदिरच पाहिलं दर्शन घडतं. 


मंदिरा समोर मोठी मोकळी जागा ही आहे आणि डावीकडे दगडी बांधकाम आहे. बहुदा ह्या खोल्या पुजाऱ्यासाठी किंवा मंदिराला भेट द्यायला येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी बनवल्या असाव्या. हे मंदिर १२ व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद याने बांधलेले आहे. हे मंदिर १२५ फुट Χ ९५ फुट आहे. हे मंदिर पाच मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैवपंचायतन म्हटले जाते. यांतील गोंदेश्वराचे शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. हेमाडपंथी बांधकामाचा उत्तम नमुना म्हणून ह्या मंदिराकडे बोट दाखवता येईल 



मंदिरात सभामंडप व गाभारा आहे. उंच आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे आणि अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. प्रमुख मंदिरा भवती असलेली इतर मंदिरं सुद्धा अप्रतिम कोरीवकाम दर्शवतात. गाभाऱ्यात पुरातन शिवलिंग आहे. आणि गाभाऱ्यातच्या दारावर अतिशय बारीक आणि सुबक नक्षीकाम केलेलं आहे . 







मंदिराच्या बाहेर अनेक देवीदेवतांची शिल्प बघायला मिळतात. 
संपूर्ण मंदिराभावती हत्तींची शिल्प कोरलेली आहेत जसे की ह्या हत्तींनी हे मंदिर उभारून पाठीवर तोलालय. मंदिराच्या बाजूला एक मोठा पाण्याचा तलाव ही आहे.


 हे मंदिर नक्कीच खास जाऊन भेट देण्यासारखं आहे. रथसप्तमीला सूर्यपूजा थाटामाटात साजरी होते अशी माहिती मिळाली.  ह्या मंदिरा  जवळच असलेलं अर्येश्वर मंदिर आणि गारगोटी म्युझियम हे देखील नक्की बघा

नाशिकहून येतांना आडवा  फाट्यावर डावीकडे वळलं की लगेच आयेश्वर मंदिर लागतं ते लहानसं मंदिर बघून गोंदेश्वर कडे जाण्याचा रस्ता गुगल नकाश्यात दाखवलेला आहे. पण जर रविवारी जाणार असाल तर गावात बाजार भरतो तेव्हा हायवे वरून गावाला वळसा घालून गोंदेश्वर मंदिरात जाल तर उत्तम